अभिनेत्री केतळी चितळे तसेच अन्य काही कलाकारांनाही अलीकडे समाजमाध्यमांवरून ट्रोल करण्यात आले होते. ट्रोल करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी काही कलाकारांनी आणि मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच या मुद्दय़ावर अजून काय करता येईल, कशा पद्धतीने आळा घालता येईल, यावरही मार्ग शोधला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले, अशी माहिती सुशांत शेलार यांनी दिली.

अभिनेत्री केतकी चितळे ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेच्या निर्मात्यांवर केलेल्या आरोपांमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. आता पुन्हा ती समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या ध्वनिचित्रफितींमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी केतकीने समाजमाध्यमावर एपिलेप्सी संदर्भात जगजागृतीच्या उद्देशाने काही ध्वनिचित्रफिती पोस्ट केल्या होत्या. त्यामधील एका ध्वनिचित्रफितीत तिने हिंदीमधून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी तिने हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे असे म्हटले होते. मात्र, केतकीच्या या पोस्टवर तिला ट्रोल करण्यात आले. तसेच यावर तिला अर्वाच्य भाषेत प्रतिक्रिया आल्या. यावर उद्विग्न होऊन केतकीने आणखी एक ध्वनिचित्रफीत पोस्ट करत ट्रोलर्सचा मराठीचा ‘क्लास’ घेतला.