सुहास जोशी

‘निसर्ग’ चक्रीवादळात विजेचे खांब पडल्याने अंधारावर मात करण्यासाठी अनेकांनी सौर दिव्यांची खरेदी सुरू केली आहे. पुढील किमान १५-२० दिवस तरी विद्युत पुरवठा सुरू होणार नसल्यामुळे इंदापूर, माणगाव आणि श्रीवर्धन या भागातून पुणे-मुंबईतील उत्पादकांकडे एकाच दिवसात ३०० सौर दिव्यांची मागणी नोंदवली आहे.

चक्रीवादळात वीज वितरणाची साखळीच तुटली आहे. विजेचे अनेक खांब उखडले गेल्याने रायगड जिल्ह्यतील ७० टक्के भागात वीजच नाही. त्यामुळे रिचार्ज करता येण्यासारखे बॅटरीवर चालणारे दिवे वापरणेदेखील शक्य नसल्याचे स्थानिक सांगतात. त्यातूनच सौर दिव्यांचा पर्याय पुढे आला असून अनेकांनी आपली मागणी पुणे-मुंबईच्या उत्पादकांकडे नोंदवली आहे.

वाढलेल्या मागणीबाबत पुरवठा करण्यात काही अडचणीदेखील असल्याचे उत्पादक नमूद करतात. सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आधी सौर दिव्यांची मागणी होत असते. त्यामुळे नवीन मागणी पूर्ण करताना साधनसामग्री मिळण्यापासून अडचणी असल्याचे, मुंबईतील उत्पादक शैलेश संसारे यांनी सांगितले.

सौर दिव्यांचे काम साधारण दिवाळीनंतर सुरू होते. मोठय़ा वितरकांकडे असा साठा बऱ्यापैकी असतो. पण गेल्या दोन महिन्यात हे सर्वच ठप्प असल्याने तयार दिव्यांमधील बॅटरीच्या आयुष्यमानाच्या खात्रीबाबत संदिग्धता असल्याचे पुणे येथील उत्पादक सचिन धांडे यांनी सांगितले.