मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांची भाषणे आक्षेपार्ह असून त्यातून तरुण दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त होत आहेत. डॉ. नाईक यांनी केलेल्या अनेक भाषणातून त्यांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे दहशतवादाचे समर्थनही केले असून त्यांच्या भाषणांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची आवश्यकता आहे, अशी स्पष्ट शिफारस डॉ. नाईक यांच्या चौकशीसाठी तयार करण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या प्राथमिक अहवालात करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना सोपविलेल्या या अहवालात डॉ. नाईक यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संघटनेची सखोल चौकशी होण्याची गरज असून त्याला होणारा अर्थपूरवठा संशयास्पद असल्याचे अधोरेखित केले आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सोमवारी सायंकाळी हा ७१ पानी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.

जुलै महिन्यात बांगलादेशमध्ये झालेल्या आयसिसच्या हल्ल्यात सहभागी असलेल्या हल्लेखोरांनी आपल्याला डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्याचे बांगलादेश पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर, मुंबई भेटीवर येणाऱ्या डॉ. नाईक यांनी आपली भारतभेट रद्द केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या संस्थेची चौकशी करण्यास सांगितली होती.

‘विशेष परिस्थितीत’ जिहाद करण्यासही इस्लमामध्ये परवानगी असल्याचा प्रचार डॉ. नाईक यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असून त्यांची अनेक भाषणे तरुणांना आयसिसकडे जाण्यास प्रेरित करणारी असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांच्या भाषणांवर बंदी घालावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. एकीकडे डॉ. नाईक यांच्याविषयी अहवालात विस्तृत विश्लेषण करण्यात आले असतानाच, त्यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेविषयीही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या संस्थेला मोठय़ा प्रमाणावर विदेशातून वित्तपुरवठा होत असून त्याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातून तरुणांना मूलतत्त्ववादाचे धडेच शिकवले जात असून त्यावरही कारवाईची मागणी या अहवालात करण्यात आली आहे.