डेंग्यू आजाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारी खरी धरली तर यावर्षी डेंग्यूमुळे देशातील सर्वाधिक ३३ मृत्यू राज्यात झाले असून त्यात मुंबईतील ११ मृत्यूंचा समावेश आहे. मात्र अनेक ठिकाणी डेंग्यू आजाराची तसेच त्याच्या मृत्यूंची अधिकृतरित्या नोंद होण्यात अडचणी येत असल्याने ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली. पावसाच्या अखेरच्या टप्प्यात डेंग्यूचे विषाणूंची वाढ होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात देशात दिल्लीसह, राजस्थान, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली.
गेल्या सहा वर्षांत देशात यावेळी सर्वाधिक ५५,०६३ रुग्ण २८ ऑक्टोबरपर्यंत आढळले, त्यातील ३५८३ डेंग्यू रुग्ण राज्यात आहेत. केरळमध्ये २३, गुजरातमध्ये १५, कर्नाटक व राजस्थामध्ये प्रत्येकी १२ जण डेंग्यूमुळे दगावले आहेत.
राज्यातील डेंग्यू मृत्यूची संख्या ३३ असून त्यातील एक तृतीयांश मृत्यू शहरातील आहेत. डेंग्यू हा नोटिफाएबल म्हणजेच खाजगी रुग्णालयांनाही नोंद करण्यास बंधनकारक आजार आहे. डेंग्यूचे विषाणू पांढऱ्या पेशींवर हल्ला चढवतात. त्यामुळे पांढऱ्या पेशींचे तसेच प्लेटलेटचे प्रमाण कमी होते.
रॅपिड तपासणीवरून हे प्रमाण कळते व लक्षणांनुसार उपचार करता येतात. बहुसंख्य खाजगी रुग्णालयात विविध प्रकारच्या रॅपिड चाचण्या केल्या जातात. मात्र डेंग्यूचे निश्चित निदान करण्यासाठी एलायझा व पीसीआर तपासण्या सरकारने आवश्यक मानल्या आहेत. या तपासण्या केल्या नसतील तर संशयित रुग्णाची नोंद डेंग्यूमध्ये केली जात नाही.
मलेरियाही धोकादायक
 मलेरियाचे प्रमाण कमी झाले असले तरी हा आजारही गंभीर आहे. मुंबईत यावर्षी आतापर्यंत मलेरियाचे १८ बळी झाले आहेत. राज्यात मलेरियामुळे ५१ मृत्य झाले असून देशात २५७ जणांचा बळी या आजारामुळे गेला आहे. गेल्यावर्षीच्या ३९१ रुग्णांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.
मुंबईत ११ मृत्यू
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार २२ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत डेंग्यूचे ६९८ रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये १६८ तर ऑक्टोबरमध्ये १२० डेंग्यू रुग्ण होते. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी तीन तर ऑक्टोबरमध्ये पाच मृत्यू (संशयित) झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue patients all time more in mumbai
First published on: 04-11-2013 at 03:35 IST