|| संदीप आचार्य
राज्यातील एकूण कर्करुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक कर्करुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाचे असतात. लहान मुलांच्या व वृद्धांच्या दंत आरोग्याचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील किमान दोन कोटी लोकांच्या दंत आरोग्याची आगामी वर्षांत तपासणी करून उपचार करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ३८ हजार डॉक्टरांच्या मदतीने हा दंत आरोग्याचा महायज्ञ पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. अशा प्रकारे राज्यव्यापी अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
तोंडाच्या कर्करोगाशिवाय दंतक्षय, हिरडय़ांचे आजार व दातांची वेडीवाकडी ठेवण हे दंत आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. दातांचे आरोग्य न जपल्यास शारीरिक व मानसिक आरोग्याचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. खेडोपाडी राहणाऱ्या लाखो लोकांमध्ये दंत आरोग्याविषयी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच त्यांना उत्तम सेवा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस असून लवकरच या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यांत हे ‘ओरल हेल्थ मिशन’ राबविण्यात येणार असून यासाठी सेंट जॉर्ज दंतवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ३८ दंत महाविद्यालये, ४५ वैद्यकीय महाविद्यालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य दंत परिषद, भारतीय दंत परिषद तसेच खासगी दंत चिकित्सक आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी लोकांच्या दंत आरोग्याची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी दोन दिवासांपूर्वी सेंट जॉर्ज दंत महाविद्यालयात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण तसेच शहरी भागात दंत आरोग्याची तपासणी व उपचार त्याचप्रमाणे दंतरोगाच्या कारणांचा अभ्यास करून भविष्यातील दंतरोगाला कशा प्रकारे अटकाव करता येईल याचे धोरण तयार करणे आणि यासाठी व्यापक जनजागृती करणे अशा तीन टप्प्यांत हा महायज्ञ केला जाईल, असे डॉ. मानसिंग पवार यांनी सांगितले. राज्यातील पन्नास टक्के लोकांची तपासणी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तर पन्नास टक्के लोकांच्या दंत आरोग्याची तपासणी शिबिरे घेऊन केली जाणार आहे.
या दंत आरोग्य अभियानात तोंडाच्या कर्करोगाला आळा घालण्याला प्राधान्य असेल तसेच राज्यातील वृद्धांच्या दंत आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार असून आवश्यकतेनुसार त्यांना मोफत कवळीही बसविण्यात येणार आहे. या तपासणीत मिळालेल्या माहितीचा अभ्यास करून भविष्यातील दंतरोगाला आळा घालण्यासाठी व्यापक धोरण तयार करता येईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री