महापालिकेचा दावा; धुरामुळे नागरिक हैराण; सत्ताधाऱ्यांवर दोषारोप
देवनार कचराभूमीत २५ हेक्टर परिसरांत बुधवारी मध्यरात्रीनंतर लागलेली आग रविवारी नियंत्रणात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला असला तरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून धुराचे लोट येतच होते. त्यामुळे आसपासच्या परिसरातील रहिवासी धुरामुळे हैराण झाले होते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर आग दिसत नसली तरी त्यातून बाहेर पडणारा धूर रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करीत होते.

देवनार कचराभूमीत बुधवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. आगीमुळे गोवंडी, मानखूर्द, चेंबूर आणि आसपासच्या परिसरांत धुराचे साम्राज्य पसरल्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास या घटनेची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्याचे काम सुरू झाले. रविवारी ही आग आटोक्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र कचराभूमीत कचऱ्यांचे उंच डोंगर निर्माण झाले असून, आग तळापर्यंत पोहोचत आहे. पोकलेनच्या साहाय्याने कचरा हलविण्याचे काम सुरू असून त्यावर मोठय़ा प्रमाणावर पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. कचराभूमीत दलदल असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळे निर्माण होत होते. अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात रविवारी सकाळी अग्निशमन दलाला यश आले, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे काम योग्य पद्धतीने न केल्यामुळे कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले असून, रविवारी या कंत्राटाची मुदत संपुष्टात आली. मात्र आगीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कंत्राटदाराने आपली यंत्रे येथेच ठेवली असून या यंत्रांचा वापर आग शमविण्यासाठी करण्यात येत आहे. मुदत संपताच कंत्राटदाराने यंत्रे काढून घेतल्यास पेच निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने पोकलेन, डोजर, जेसीबी, डम्पर, पाण्याचे टँकर आदी भाडेतत्त्वावर घेतले असून, तेही कचराभूमीत तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे आग शमविण्यासाठी अतिरिक्त यंत्रांची कुमक मिळाली आहे.
धुराचे साम्राज्य
कचराभूमीतील आगीमुळे आसपासच्या परिसरांत रविवारी सकाळी धुराचे साम्राज्य पसरले होते, असा दावा नगरसेवक रईस शेख यांनी केला आहे. कचराभूमीतील आगग्रस्त २५ हेक्टरपैकी २५ टक्के भागांत आजही आग धुमसत असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.