scorecardresearch

“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!”

अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”!

ajit pawar slams navneet rana ravi rana
अजित पवार यांची नवनीर राणा आणि रवी राणा यांच्यावर टीका!

शनिवारी दिवसभर मुंबईत नवनीत राणा आणि रवी राणा हे मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पोहोचणार का? याचीच चर्चा सुरू होती. त्यामुळे सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्ते मातोश्रीबाहेर आणि राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला मातोश्रीपर्यंत पोहोचणं अशक्य झालं. अखेर मातोश्रीवर न जाता आंदोलन संपवत असल्याचं राणा दाम्पत्यानं जाहीर केलं. मात्र, त्यानंतर त्यांना अटक केल्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. यासंदर्भात भाजपानं सरकारवर टीका केली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्यालाच उलट सवाल केला आहे.

“नो कॉमेंट्स म्हणून गप्प बसायला हवं ना?”

अजित पवार यांनी रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “कुणावरच हल्ला व्हायला नको. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. प्रत्येकानं शांततेनं घ्यायला हवं. पण आपणही कुणालातरी उचकवण्याचा प्रयत्न करायला नको. आपण काम करत असताना माध्यमांनी मला एखादा प्रश्न विचारल्यानंतर मला तो नाही पटला तर त्यावर मी उलटं बोलण्यापेक्षा नो कॉमेंट्स म्हणून गप्प बसायला हवं. त्यात दुसऱ्यावर राग काढायचं कारण काय?” असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे

“तुम्ही बडनेऱ्याचे लोकप्रतिनिधी…”

“महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी सगळं मंत्रिमंडळ प्रयत्न करत आहे. हे होत असताना त्यातून नवीन प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टीने काही घडू नये. तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही बडनेऱ्याचे लोकप्रतिनिधी आहात. तिथे काम करत असताना… मातोश्रीबद्दल आजच नाही, बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना नेहमीच फार तीव्र असतात. लोक बाळासाहेबांना जाऊन भेटायचे, उद्धव ठाकरेंना जाऊन भेटतात. त्यांचं दैवत म्हणून ते त्यांच्याकडे बघत असतात. हा त्यांचा दृष्टीकोन आहे. तीच गोष्ट शरद पवारांच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची असते, सोनिया गांधींच्या बाबतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची असते मोदी-अमित शाह यांच्याबाबतीत भाजपा कार्यकर्त्यांची असते, रामदास आठवलेंच्या बाबतीत आरपीआयच्या कार्यकर्त्यांची आहे. ही वस्तुस्थिती आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“मातोश्रीत बसलेल्या मर्दानी फक्त २४ तास पोलिसांना सुट्टी द्यावी, मग…”, नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान!

“करायचं तर तुमच्या घरासमोर करा”

दरम्यान, तुम्हाला असं काही करायचं असेल, तर तुमच्या घरात, मंदिरात जाऊन करा, असा सल्ला देखील अजित पवारांनी दिला आहे. “जाणीवपूर्वक तिथे काही ना काही वक्तव्य करून त्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत हे दिसत असताना असं वक्तव्य करणं. असं वक्तव्य करत असताना आमचे एक मंत्रिमहोदय एकनाथ शिंदे सांगत होते की तिथे जाणं एवढं सोपं नाही. सगळे सांगत होते. ऐकलं पाहिजे होतं ना. एवढा अट्टाहास का? करायचं तर तुमच्या घरासमोर काय करायचं ते करा ना बाबा. तुमच्या घरात करा, मंदिरात जाऊन करा, कुणालाच काही विरोध असायचं कारण नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

“पोलिसांनी काम चोख बजावायला हवं”

राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी आपलं काम चोख बजावायला हवं, असं अजित पवार म्हणाले आहेत. “तुम्ही तुमचं काम करत असताना राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका. आम्ही सरकारमध्ये असलो, तरी पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे बजावलं पाहिजे. राजकीय हस्तक्षेप मुळीच असता कामा नये. या प्रकरणात असं झालं असेल असं मी अजिबात म्हणत नाही. पण सगळ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर हे प्रश्न निर्माण होणार नाही”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deputy cm ajit pawar slams navneet rana ravi on hamuman chaleesa matoshree pmw

ताज्या बातम्या