शनिवारी मध्यरात्री उशीरा मुंबईतल्या खार पोलीस स्टेशनबाहेर झालेल्या राड्यानंतर आता राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अटकेत असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेत झाली. यामध्ये किरीट सोमय्यांना किरकोळ जखम देखील झाली. मात्र, यावरून भाजपानं आता राज्य सरकारवर आणि पोलील विभागावर टीका करायला सुरुवात केली आहे. या प्रकारावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना जाहीर आव्हानच दिलं आहे.

काय घडलं काल मध्यरात्री?

शनिवारी दिवसभर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिल्यानंतर दुपारी माध्यमांशी बोलताना मातोश्रीवर न जाताच आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केलं. यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. यासंदर्भा दिवसभर वातावरण तापल्यानंतर रात्री उशीरा राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची एक काच देखील फुटली असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. यावरून आता भाजपाकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

पोलीस विभाग निशाण्यावर!

दरम्यान, राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी मध्यरात्री सगळा राडा होत असताना मूक भूमिका घेतल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट जाहीर आव्हान दिलं आहे.

“जर महाराष्ट्रात पोलीस विभागाच्या संरक्षणात दररोज भाजपाच्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंच्या गुंडांकडून हल्ले होणार असतील, तर त्याला शौर्य म्हणत नाहीत. मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास सुटीवर पाठवावं. मग हे सगळे हल्ले थांबतील याची आम्ही काळजी घेऊ”, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नितेश राणेंनी ट्वीट केलं आहे.

मध्यरात्रीच्या घडामोडींनंतर किरीट सोमय्यांची राज्य सरकारवर आगपाखड; म्हणाले, “…तर ठाकरे सरकार मूर्खांच्या स्वर्गात आहे”!

किरीट सोमय्यांची आगपाखड

दरम्यान, या संदर्भात मध्यरात्री माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “मला वाटतं मुंबई पोलीस आणि उद्धव ठाकरेंच्या संगनमताने हा हल्ला झाला आहे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हा तिसरा प्रयत्न झाला आहे. पहिला वाशिम, दुसरा पुणे आणि नंतर खार. आश्चर्याची बाब म्हणजे माझी एफआयआर पोलीस घेत नाहीत. पण माझ्या नावाने एक बोगस एफआयआर पोलिसांनी स्वत:च रजिस्टर केली. त्यात लिहिलं की कुठूनतरी एकच दगड आला होता”, असं किरीट सोमय्या म्हणाले.