डास उत्पत्ती न रोखणाऱ्या विकासकांवर बांधकाम बंदीची कारवाई

डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या मुंबईतील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांची गंभीर दखल घेत पालिकेने विकासकांना १० कलमी कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या मुंबईतील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांची गंभीर दखल घेत पालिकेने विकासकांना १० कलमी कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या उपाययोजना न करणाऱ्या विकासकांची बांधकामे तात्काळ थांबवून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिले आहे. त्यामुळे आता विकासकांना आपल्या कामगारांच्या आरोग्याबरोबरच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे.
मुंबईमध्ये हळूहळू साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात झाल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डॉक्टरची नियुक्ती करणे, कामगारांना आरोग्य पुस्तिका देणे, नव्या कामगारांची हिवतापविषयक रक्त चाचणी करून घेणे, कामगारांना मच्छर प्रतिबंधक जाळ्या उपलब्ध कराव्यात, कामगारांचा निवासाचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना पालिकेने विकासकांना केली आहे. पत्रे, पाण्याचे पिंप, शिरस्त्राणे, घमेले, एम. एस. चॅनेल्स, कामगारांच्या झोपडीसदृश घरावर लावण्यात येणाऱ्या ताडपत्री वा प्लास्टिकला पडणाऱ्या घडय़ा आदी ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबतीत काळजी घेऊन पाणी साठू नये यासाठी उपाययोजना करावी. इमारतीच्या बांधकाम परिसरात तळघर व जमिनीखाली असलेल्या परिसरांमध्ये पावसाचे पाणी किंवा झिरपणारे पाणी साचू नये यासाठी अधिक क्षमतेचे पंप बसवून पाण्याचा निचरा करावा, तेथे दिव्यांची व्यवस्था करावी, इमारतीतील शौचालये, न्हाणीघरासाठी केलेल्या खड्डय़ांमध्ये, तसेच इतर ठिकाणी क्युरिंग प्रक्रियेसाठी टाकण्यात आलेले पाणी योग्य वेळी काढून टाकावे, असे आदेश पालिकेने विकासकांना दिले आहेत. मुंबईत सध्या २,७४१ ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बांधकाम ठिकाणी १० कलमी कार्यक्रम राबविण्याचे आदेश या सर्व विकासकांना देण्यात आले आहेत. या ठिकाणांवर पालिका करडी नजर ठेवणार असून सुचविलेल्या उपाययोजना न करणाऱ्या विकासकाला पालिकेच्या इमारत प्रस्ताव खात्यामार्फत बांधकाम थांबविण्याचे आदेश देऊन त्याच्याविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Developers ban on the construction to stop mosquito breeding

ताज्या बातम्या