Mumbai Mahamorcha: महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योगधंदे यासंदर्भात राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. मात्र, हा विराट मोर्चा नव्हता, असा दावा करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खोचक टीका केली आहे.

“खरंतर आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे, कुठल्या साली झाला हे माहिती नाही अशी मंडळी कोणत्या तोंडानं आज हा मोर्चा काढत आहेत? महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे महापुरुषांचा अपमान होऊच नये, या मताचे आम्ही आहोत. तो कुणी करत असेल, तर ते योग्य नाही हे वारंवार सगळ्यांनी सांगितलं आहे. पण जाणीवपूर्वक त्याचा राजकीय मुद्दा केला जातोय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

MVA Mahamorcha: “जर राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर…”, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; ‘महामोर्चा’तील सभेतून हल्लाबोल!

“मोर्चा अपयशी ठरला हे…”

“मोर्चा तर नॅनो झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून माणसं बोलवल्यानंतर परिस्थिती अशी हवी होती की कैक किलोमीटर लांब मोर्चा झाला. पूर्ण आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता. पण मोर्चा अपयशी ठरला हे संख्येवरून दिसतंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मोर्चाचं कोणतं विराट स्वरूप उद्धव ठाकरेंना दिसलं?”

“खरंतर तीन पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज कुणी ड्रोन शॉट दाखवू शकलं नाही. सगळे क्लोजअप दाखवत होते. कारण ड्रोन शॉटलायक मोर्चाच नव्हता. आम्हाला हे आधीही माहिती होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या. पण मोर्चात आझाद मैदानाइतकी संख्या राहणार नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता निमुळता होतो, अशी जागा त्यांनी निवडली. त्यामुळे या मोर्चाचं कोणतं विराट स्वरूप उद्धवजींना दिसलं? त्यांचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसा हा मोर्चाही नॅनोच आहे”, अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

“स्वत:ला बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे तोतये समजतात, पण…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपालांवर कारवाई होणार?

दरम्यान, मविआकडून महामोर्चामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावर फडणवीसांनी यावेळी उत्तर दिलं. राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी मविआकडून करण्यात आली. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी केंद्र सरकार निर्णय घेईल, असं सांगितलं. “याबाबत केंद्र सरकार योग्य वेळी निर्णय घेईल”, असं ते म्हणाले.