मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या काही आमदारांनी केलेले बंड हा शिवसेनेचा पक्षांतर्गत मामला असल्याचा सावध पवित्रा भाजपने घेतला असला तरी महाविकास आघाडी सरकारला खिंडार पाडण्यासाठी वेगाने हालचाली होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजप नेते शिंदे यांच्यासह फुटीर आमदारांच्या संपर्कात आहेत.

शिंदे यांना समर्थक आमदारांसह अहमदाबाद व सुरतला पाठविण्यामागे भाजपचे नियोजन असून फडणवीस, गिरीश महाजन, संजय कुटे यांच्यासह काही भाजप नेते शिंदे यांच्याशी बोलणी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह केंद्रीय नेते या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिवसेनेतील फूट दाखविण्यासाठी ३६ आमदार शिंदे यांच्याबरोबर सेनेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. मात्र पक्षांतर्गत दबाव व अन्य कारणांमुळे १०-१५ आमदारांहून अधिक आमदारांचा शिंदे यांना पािठबा नसल्याचे सध्या चित्र आहे. काही आमदार माघारी फिरतील, अशीही शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि अल्पावधीतच ते परत फिरले. त्याप्रमाणे शिंदे व अन्य आमदारही आपल्या भूमिकेवर ठाम राहतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होऊ नये आणि सरकार अडचणीत आणावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र शिंदे व समर्थक आमदारांचे बंड किती काळ सुरू राहते, हे चित्र स्पष्ट झाल्यावर भाजप पुढील हालचाली करणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.