मुंबई : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी केली. राज्यपाल राधाकृष्णन यांचे नाव मुंबईतील मतदारयादीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार असलेल्या राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती फडणवीस यांनी पवार-ठाकरे यांना केली.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेससह इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात पवार-ठाकरे हे काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत एकत्र आहेत. त्यामुळे ते रेड्डी यांच्या उमेदवारीस पाठिंबा देणार आहेत. तरीही फडणवीस यांनी पवार-ठाकरे यांना दूरध्वनी करून राधाकृष्णन यांना पाठिंबा मागितला आहे.

लोकसभा व राज्यसभेत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातो. तरीही फडणवीस यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त करावी लागते यावरून भाजपमध्ये काही तरी गडबड दिसते, असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला.