मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे हायड्रोजन बाँब फोडणार, असे सांगत होते. त्यामुळे अख्खा देश घाबरला होता. पण ते साधा लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत. त्यांनी फुसका बार लावला, ते सराईत खोटे बोलणारे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.
राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा निवडणूक आयोगावर आरोपींची राळ उडविली. महाराष्ट्रातील निवडणुकीचा संदर्भ देवून मतचोरीच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. आयोगानेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. गांधी यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, रोज खोटे बोलायचे, हे गोबेल्सचे तंत्र गांधी यांनी अजमावले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना अनेकदा नोटीस दिली. पण ते आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा आयोगापुढे किंवा न्यायालयातही देवू शकले नाहीत. प्रत्येक वेळी प्रसिद्धीमाध्यमांपुढे येऊन खोटे बोलण्याची त्यांची हिंमत वाखाणण्याजोगी आहे, याबद्दल मात्र मी त्यांचे कौतुक करतो. अशाप्रकारचा नेता मी आजपर्यंत कधीही पाहिला नाही, अशी खोचक टिप्पणी फडणवीस यांनी केली.
राहुल गांधी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. ते जनतेमध्ये जातील, तर कधीतरी निवडणुकीचे निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतील. पण अशाप्रकारे खोटे बोलत राहिले, तर त्यांच्याबाजूने निवडणुकीचे निकाल येवू शकणार नाहीत. गांधी हे निवडणूक आयोग, न्यायालये यासारख्या संविधानिक संस्थांचा अपमान करीत आहेत. त्यांना देशाची नसही सापडलेली नाही. खोटे बोलून बिहारची निवडणूक जिंकता येईल, असे त्यांना वाटत आहे. पण बिहारची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी
महाराष्ट्रातील पराभव राहुल गांधींच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे ते वारंवार महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत आरोप करीत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. विधानसभा निवडणूक जिंकणार, अशा भ्रमात राहून काँग्रेसने हॉटेल बुक केली होती, मंत्रिमंडळाची रचना तयार करुन ठेवली होती. पण त्यांना जनतेने झटका दिला. महाराष्ट्रासंदर्भातील गांधी यांची वक्तव्ये खोटी ठरली. निवडणूक आयोगानेही गांधी यांची वक्तव्ये निराधार असल्याचे पुरावे जाहीर केले, असे फडणवीस यांनी नमूद केले.