Devendra Fadnavis : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले. याबाबत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया नेमकी काय?

उच्च न्यायालयाने दिलेला २००६ च्या बॉम्बस्फोटांबाबत दिलेला निर्णय हा धक्कादायक आहे. खालच्या कोर्टाने वेगळा निर्णय दिला होता. एटीएसने आरोपी पकडले होते. पुरावे सादर केले होते. मी अजून संपूर्ण निर्णय वाचलेला नाही. तरीही माझं काही तज्ज्ञांशी या संदर्भात बोलणं झालं आहे. लवकरात लवकर आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि या निर्णयाला आव्हान देऊ. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

११ जुलै २००६ ला काय घडलं होतं?

११ जुलै,२००६ चा मंगळवार मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान माटुंगा रोड ते मिरा रोड दरम्यान सात साखळी बॉम्बस्फोट घडले. प्रथम श्रेणीच्या डब्यात घडवून आलेल्या या स्फोटांमध्ये २०९ जणांचा मृत्यू झाला. त्यातील एक बॉम्ब ठेवणारा सलीम नावाचा पाकिस्तानी दहशतवादी याच स्फोटात ठार झाला होता, असा दावा पोलिसांकडून त्यावेळी करण्यात आला होता. १९९३ च्या मुंबईतील साखळी स्फोटानंतर हा मुंबईतील मोठा मानवी संहार होता. त्यात २०९ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० जण गंभीर जखमी झाले होते. हे सर्व बॉम्बस्फोट प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये घडवून आणल्यामुळे स्फोटांमध्ये उच्च पदावर कार्यरत अधिकारी व व्यापाऱ्यांची संख्या मृतांमध्ये अधिक होती. ११ मिनिटांच्या कालावधीत सात लोकलमध्ये हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. माटुंगा, माहिम, वांद्रे ते खार, खार ते सांताक्रुझ, जोगेश्वरी, बोरीवली व मिरा रोड ते भाईंदर या स्थानकांच्या दरम्यान सात स्फोट झाले. याबाबत आलेला निकाल धक्कादायक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या वाढदिवसानिमित्ताने बॅनर आणि पोस्टर नकोत-फडणवीस

माझा वाढदिवस जरी असला तरीही माझी सगळ्यांना विनंती आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर पोस्टर लावू नका. त्यापेक्षा मुख्यमंत्री सहायता निधीत ते पैसे द्या. गरीब आणि गरजू लोकांना त्या निधीतून आपण मदत करतो. जे लोक बॅनर लावत आहेत त्यांना हे पुन्हा सांगतो की बॅनर आणि पोस्टर लावून खुश करु शकणार नाही. मुख्यमंत्री सहायता निधीत निधी दिलात तर मला आनंद होईल. वाढदिवस हा निश्चित इतर दिवसांसारखा असतो त्यात वेगळं काही नसतं असंही मुख्यमंत्री म्हणाले.