विधानसभेत मतविभाजन टाळून फक्त आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या कानमंत्राचा विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकांची कामे करण्यासाठी सरकार चालवा. सरकार वाचविण्यासाठी चालवू नका, असा कानमंत्र मोदी यांनी आपल्याला दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, बुधवारी मतविभाजन टाळून फक्त आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतल्यामुळे फडणवीस स्वतःचे पद वाचविण्यासाठी सरकार चालवत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सर्वसाधारणपणे विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जात नाही, असे संकेत आहेत. विरोधकांकडून मतविभाजनाची मागणी केल्यावर अध्यक्षांकडून मतविभाजन केले जाते, अशी संसदीय लोकशाहीतील परंपरा आहे. भाजप सरकारकडून बुधवारी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडल्यावर तो केवळ आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले. या ठरावावर मतविभाजन घेण्याची मागणी शिवसेना आणि कॉंग्रेसकडून करण्यात आली. मात्र, अध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली नाही आणि कार्यक्रम पत्रिकेवरील पुढील विषय पुकारला. या प्रकारामुळे विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
मतविभाजन टाळण्याच्या प्रकारामुळे भाजप सरकारच्या घटनात्मक वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केवळ सरकार वाचविण्यासाठीच आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात आल्याची टीका करण्यात येते आहे.