शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास सरकारचा हिरवा कंदील

दुखावलेल्या शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चुचकारणे सुरु केले असून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मान्यता देण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत सरकारच उच्च न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता असून शिवसेनेनेही अर्ज केल्यास सरकार न्यायालयात शिवसेनेला पाठिंबा देईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

प्रचंड पोलिस बंदोबस्त पुरवून शिवसेनेचा विरोध मोडून काढत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्विघ्नपणे पार पाडले. त्यातून शिवसेना कमालीची दुखावली असून असून शिवसेनेच्या पाठिंब्यावर सरकार टिकून असल्याने शिवसेनेने टोकाची भूमिका घेऊ नये, यासाठी आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

शिवसेनेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून परंपरेप्रमाणे दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. हे मैदान खेळाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापरण्यात येऊ नये, असे न्यायालयाचे आदेश असून हा परिसर शांतता क्षेत्रात येत असल्याने ध्वनिवर्धकाचा वापर करण्यावरही र्निबध आहेत.

त्यामुळे दरवर्षी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावून मेळाव्यासाठी परवानगी मिळविताना शिवसेनेला बरेच कष्ट घ्यावे लागतात.पण आता शिवसेना सत्तेत असल्याने आणि शिवसेनेचा राग शांत करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास मान्यता देण्याची भूमिका घेतली आहे.  त्यासाठी उच्च न्यायालयात सरकारकडूनच अर्ज केला जाण्याची शक्यता असून शिवसेनेने जर न्यायालयात याचिका सादर केली, तर त्यास सरकारने न्यायालयातही पाठिंबा द्यावा, असा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे.