मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
गृह विभागाच्या विविध परवान्यांच्या जाचातून हॉटेल व आदरतिथ्य उद्योगाला मुक्त करण्यात आले आहे. आता यापुढे खाद्य नोंदणी प्रमाणपत्र, तरणतलाव, मनोरंजन, सादरीकरण यांसाठी गृह विभागाकडून घ्यावे लागणारे पाच परवाने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ या मोहिमेंतर्गत राज्यातील उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी शासकीय परवान्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या परवान्यांची संख्या निम्यापेक्षाही कमी करण्यात सरकारला यश आले आहे.
यापूर्वी उद्योग, नगरविकास, पर्यावरण इत्यादी विभागांच्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता या मोहिमेला मुख्यमंत्र्यांकडेच असलेल्या गृह विभागानेही पाठबळ दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या गृह विभागाच्या बैठकीत हॉटेलसाठी लागणाऱ्या परवानग्या कमी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गृह विभागाने मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार हॉटेल व आदरतिथ्य उद्योगांना आता खाद्य नोंदणी प्रमाणपत्र, तरणतलाव परवाना, मनोरंजनाच्या ठिकाणासाठी परवाना, सादरीकरण, इत्यादी प्रकारच्या परवानग्या घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2016 रोजी प्रकाशित
परवाना जाचातून हॉटेल उद्योग मुक्त!
गृह विभागाच्या विविध परवान्यांच्या जाचातून हॉटेल व आदरतिथ्य उद्योगाला मुक्त करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-01-2016 at 03:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis hotel industry free from license