Devendra Fadnavis On Meenatai Thackeray Statue: मुंबईमधील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची घटना आज घडली. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

तसेच या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग न देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“अशा प्रकारची घटना निषेधार्थ आहे. ज्या कोणत्या समाज कंटकाने ही घटना केली असेल त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील. मात्र, या पेक्षा या घटनेला राजकीय रंग देणं मला योग्य वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?

“आज घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. यामागे अशी व्यक्ती असू शकते ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते. कुणीतरी लावारिस माणसाने हे केलं असेल. बिहारमध्ये जसा मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न करण्यात आला असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग हा असू शकेल. तूर्तास पोलीस या प्रकरणी शोध घेत आहेत. पुढे काय होतं आहे आपण पाहू.” असं उद्धव ठाकरेंनी या घटनेवर बोलताना म्हटलं.

राज ठाकरेंकडून पुतळ्याची पाहणी

राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंचा पुतळा असलेल्या परिसरात जी घटना घडली, त्याची संपूर्ण माहिती घेतली. या परिसरात नेमकं काय काय घडलं आणि आतापर्यंत पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली? याची संपूर्ण माहिती राज ठाकरेंनी घेतली. राज ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मनसे सचिव सचिन मोर यांनी घटनास्थळी येऊन आढावा घेतला. त्यानंतर सर्व घटनाक्रम राज ठाकरे यांना सांगण्यात आला. यानंतर राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ दाखल होत पाहणी केली.