* राज्यात १९ हजार गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर
* सुनिल मनोहर राज्याचे नवे महाधिवक्ता
राज्याच्या जनतेने मोठ्या विश्वासाने भाजपला निवडून दिलं आहे. शिवसेनेसाठी चर्चेचे दरवाजे नेहमीच खुले आहेत आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. आमचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चितपणे पूर्ण करेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
राज्यात पुन्हा निवडणुका व्हाव्यात असे कोणत्याही आमदाराला किंवा कोणत्याही पक्षाला वाटत नाही. राज्यात स्थिर सरकार असावे अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत याचा विश्वास असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.  अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत राज्यात कोणाला किती सुरक्षा द्यायची यासाठी उच्चस्तरिय समितीलाच पूर्ण अधिकार असतील. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून यात राज्य सरकार हस्तक्षेप करणार नाही. अंतिम निर्णय हा याच समितीचा असेल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच सहकारी संस्थांच्या (अ आणि ब गटातील) निवडणुकांना ३० जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. महाधिवक्ता दरायस खंबाटा यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी सुनील मनोहर यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात आल्याचीही माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील न्यायाधीशांच्या संख्येत दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून लवकरच १७९ न्यायाधीशांची नवीन पदं भरण्यात येतील असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात शेतकऱयांना हवामानाचा अजून अंदाज मिळेल अशी यंत्रणा बसविण्यात येणार असून राज्यात २०६५ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली. राज्यातील १९ हजार गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्याचेही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच केंद्राकडे याबाबत निवेदन पाठविल्याचेही ते पुढे म्हणाले. येत्या सात दिवसांत दुष्काळाचं मेमोरॅण्डम जाहीर होणार. महसूल मंत्रांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमण्यात येईल. या समितीत ग्रामविकासमंत्री, अर्थमंत्री असतील असे फडणवीस यांनी सांगितले. अवकाळी पावसात ५० हजार हेक्टरचं नुकसान झाल्याची कबुली देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.