बाँबस्फोट खटल्यातील आरोपींकडून नवाब मलिक यांची जमीनखरेदी ; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

आपल्याकडे आणखी चार मालमत्तांची प्रकरणे असून त्यातून मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध आणखी उघड होतील.

मुंबई : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणातील गुन्हेगार सरदार शहा वली खान आणि कुख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसीना परकारचा हस्तक मोहम्मद सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेलकडून करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागेची कवडीमोल दराने खरेदी केली. मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी आर्थिक संबंध असल्याचा हल्लाबोल  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आपल्याकडे आणखी चार मालमत्तांची प्रकरणे असून त्यातून मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध आणखी उघड होतील. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या तपास यंत्रणांच्या कार्यकक्षेनुसार दिली जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मलिकांवर कारवाई करावी, यासाठी पाठविली जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरदार शहा वली खानला विशेष टाडा न्यायालयाने बाँबस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ती सर्वोच्च न्यायालयाने कायम केली आहे व सध्या तो कारागृहात आहे. टायगर मेमनने काही आरोपींना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले होते, त्यात तो सहभागी होता.

मुंबई शेअर बाजार आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीजवळ आरडीएक्स कुठे ठेवायचे, याबाबत त्याने सर्वेक्षण केले होते. बाँबस्फोट कारस्थानासंदर्भात झालेल्या सर्व बैठकांमध्ये तो उपस्थित होता. बाँबस्फोटांच्या कटाची त्याला पूर्णपणे माहिती होती.  बाँबस्फोटाचा प्रमुख सूत्रधार टायगर मेमनच्या माहीम येथील अल हुसैनी इमारतीच्या आवारात गाडय़ांमध्ये आरडीएक्स भरण्यात सरदार शहा वली खानचा सहभाग होता. माफीच्या साक्षीदारांचे व आरोपींचे जबाब आणि अन्य पुराव्यांमुळे त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सलीम पटेल हा हसीना परकारचा हस्तक असून त्याला तिच्याबरोबर २००७ मध्ये अटक झाली होती. त्याला पुढे करून मालमत्ता बळकाविण्याचे काम ती करीत होती. या दोघांकडून नवाब मलिक यांच्या कंपनीने जागा खरेदी केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

मलिक यांच्या कुटुंबीयांच्या सॉलिड्स कंपनीने कुल्र्यामध्ये लालबहादूर शास्त्री रस्त्यावर (एलबीएस रोड) अतिशय मोक्याची सुमारे तीन एकर जागा शहा वली खान आणि सलीम पटेल या आरोपींकडून केवळ ३० लाख रुपयांमध्ये विकत घेतली व त्यातील २० लाख रुपये दिले गेले. सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.च्या वतीने फराज मलिक यांची कागदोपत्री स्वाक्षरी असून या कंपनीत नवाब मलिक हे काही काळ संचालक होते. मलिक यांच्या कंपनीला या जागेचे दरमहा एक कोटी रुपये भाडे मिळत आहे असा आरोपही फडणवीस यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis says nawab malik made land deal with bomb blast accused zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या