जवळपास दीड वर्षापूर्वी म्हणजेच २०१९मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपाचा काडीमोड होऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि भाजपाला सत्तेबाहेर राहावं लागलं. सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपाकडून सातत्याने सरकार पडणार असल्याची विधानं आणि मुहूर्त सांगितले जात होते. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता या मुद्द्यावर सूचक विधान केलं आहे. त्यामुळे सेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेला त्यांनी अप्रत्यक्षपणे बळच दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणाच्या भेटीगाठी झाल्या, कल्पना नाही!

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची चर्चा सुरू असून संजय राऊतांनी ही चर्चा फेटाळली आहे. याविषयी फडणवीसांना पत्रकारांनी विचारले असता “कोणाच्या भेटीगाठी झाल्या, याविषयी मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजपा, सेना किंवा कुणाचीही भेटगाठ नाही किंवा चर्चा नाही. भाजपा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन जनतेसाठी लढा देण्याची आमची तयारी आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“आमचा काही धुऱ्याचा वाद नाही!”

दरम्यान, सेना-भाजपा एकत्र येण्याची शक्यता फडणवीसांनी स्वीकारली नसली, तरी फेटाळली देखील नाही. “आमच्यात कधीही शत्रुत्व नव्हतं. आम्ही शत्रू नाही. आमचे वैचारिक मतभेद झाले कारण आमचा हात सोडून आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र ज्यांच्याविरुद्ध निवडून आले, त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळेच मतभेद निर्माण झाले. पण तो काही धुऱ्याचा वाद नाहीये की सुधीरभाऊंचा धुरा उद्धवजींच्या धुऱ्याला लागून आहे आणि त्यांनी यांच्या धुऱ्यावर अतिक्रमण केलं असं नाहीये. त्यामुळे आमचं कुठलंही शत्रुत्व नाहीये. वैचारिक मतभेद तर आहेच”, असं फडणवीस म्हणाले.

“सरकारचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा!

राजकारणात जर-तरला अर्थ नसतो!

यावेळी शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याच्या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया न देता देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. “राजकारणात जर-तरला अर्थ नसतो. परिस्थिती जशी येते, त्यानुसार निर्णय होत असतात. जर-तरवर जे राजकारणी राहतात, ते स्वप्नच पाहात राहतात”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis speaks on shivsena and bjp coming together again in maharashtra pmw
First published on: 04-07-2021 at 19:28 IST