मुंबईतील मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून सुरु असलेल्या विरोधानंतर बुधवारी संकुलाच्या उद्धाटनाआधी भाजपा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याकडून या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रसच्या सचिन सावंत यांनी दिली आहे.

“इतिहासाला काळा गोरा रंगवून टिपू सुलतानच्या नावाचा विरोध करणाऱ्या भाजपासाठी, पेशव्यांच्या सेनेने इंग्रजांशी मिळून श्रींगेरी मठ उध्वस्त केला,तेव्हा देवस्थानाचे रक्षण व पुनर्स्थापना टिपू सुलतानने केली होती. म्हैसूर गॅझेटमध्ये टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी दिली आहे. कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिरातील पुजारी टिपूच्या सन्मानार्थ दररोज संध्याकाळी ७:३९ वाजता “सलाम मंगलरथी” करतात. नंजनगुड येथील श्रीकंठेश्वर मंदिरात, टिपूने सादर केलेल्या पन्नाच्या लिंगाची पूजा सुरू आहे. नेताजी बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन मोदींनी केले त्याच नेताजींनी टिपूचा शहीद म्हणून उल्लेख केला व टिपूच्या म्हैसूर टायगरचा समावेश आझाद हिंद सेनेच्या झेंडा तथा गणवेशावर केला होता. २०१७ ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामदास कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का?,” असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.

“ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे. “भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही प्रतिज्ञा घेतलेल्या व विविधतेचे निदर्शक  तिरंग्यातील तीन रंगांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने भाजपा व संघाच्या विकृत विचारधारेचा निकराने विरोध केला पाहिजे,” असेही सचिन सावंत यांनी म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजपा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. भाजपा आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला विरोध करण्यात येत आहे. देशात एपीजे अब्दुल कलामसारखे लोक होऊन गेलेत, त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.