१९९३ सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटापूर्वी आपण अभिनेता संजय दत्त याच्या घरी गेलोच नाही तर एके-४७ रायफल त्याला देण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा कुख्यात गुंड आणि बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याने मंगळवारी विशेष ‘टाडा’ न्यायालयासमोर केला. विशेष म्हणजे संजय दत्तला याचप्रकरणी एके-४७ रायफल बाळकल्याप्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली असून येरवडा येथे तो ही शिक्षा भोगत आहे.
सालेमसह मुस्तफा डोसा, रियाज सिद्दिकी, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल राशीद आणि ताहिर र्मचट या आरोपींविरोधात खटला चालविण्यात येत आहे. सध्या आरोपींचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून मंगळवारच्या सुनावणीत सालेमला त्याच्याविरोधात सादर पुराव्यांविषयी म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले. त्या वेळी त्याने आपण बॉम्बस्फोटापूर्वी संजय दत्तच्या घरी गेलो नसल्याचे आणि त्याला एके-४७ रायफल दिली नसल्याचा दावा केला.
या आरोपींना नंतर अटक करण्यात आल्याने त्यांच्याविरोधातील खटला सध्या चालविण्यात येत आहे. यापूर्वी २००६ मध्ये ‘टाडा’ न्यायालयाने स्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याचा भाऊ याकूबसह १०० जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी याकूबला फाशीची शिक्षा झाली होती व गेल्याच महिन्यात त्याला फाशी देण्यात आली. तर संजय दत्तला या प्रकरणी न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मंगळवारी आरोपी म्हणून आपला जबाब देताना सालेमने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. पहिल्यांदा संजय दत्त याच्या घरी गेल्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी आपण त्याच्या घरी गेल्याचा आणि त्याच्याकडील दोन रायफल्स, हातबॉम्ब आणि गोळ्या परत आणल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा त्याने केला. शिवाय पोर्तुगाल सरकारने आपल्याबाबत केलेला हस्तांतरण करार रद्द केल्यावर आपल्याविरोधात खटला चालविण्यात येणे हे बेकायदा असल्याचा दावाही सालेमने केला.