जम्मू आणि काश्मीरला घटनेच्या कलम ३७० नुसार बहाल करण्यात आलेले विशेषाधिकार रद्द करण्याच्या निर्णयावर काँग्रेसमध्ये वेगवेगळे सूर उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस व विशेषत: पवार कुटुंबीयांमध्येच विभिन्न मते मांडण्यात आली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केंद्राच्या निर्णयावर टीका केली असतानाच, अजित पवार यांनी मात्र केंद्राच्या निर्णयाचे समर्थन केले.

कलम ३७० नुसार जम्मू आणि काश्मीरला बहाल करण्यात आलेले विशेष अधिकार काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सोमवारी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. केंद्राने स्थानिक नेतृत्व आणि जनतेला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याची टीका पवारांनी केली होती. मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन राज्यांच्या निर्मितीसाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावरील चर्चेत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

३७० कलमातील तरतुदी वारंवार सौम्य करण्यात आल्या होत्या याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले. हे कलम लागू असतानाही देशाच्या अन्य भागांप्रमाणे वस्तू आणि सेवाकर लागू करण्यात आला. प्राप्तिकर वसूल केला जातो याकडे सुळे यांनी लक्ष वेघले. सोमवारी राज्यसभेतील मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहिष्कार घातला.

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतला असून त्यामुळे जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विकासाला मदतच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.