एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मेटाकुटीला
मुंबई : राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षांचे केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच देण्यात आले असले तरी ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसमोरील परीक्षा पेच संपलेला नाही. अद्यापही एसटीचा संप मिटलेला नसल्याने शाळेतच परीक्षा केंद्र असले तरी तेथे कसे पोहोचायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. जवळपास ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्यमंडळ) दहावी, बारावीच्या परीक्षा लेखीच घेण्याचे जाहीर करून त्यानुसार तयारी केली आहे. सध्या दहावी, बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत.
बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच परीक्षेचे केंद्र असेल, असे राज्यमंडळाने जाहीर केले. त्यानुसार परीक्षा केंद्र जवळपास दुपटीने वाढली आहेत. मात्र, तरीही विद्यार्थ्यांसमोरील पेच सुटलेला नाही. परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
पेच काय?
’राज्यात ऑक्टोबर महिन्यापासून एसटीचा संप सुरू आहे. काही प्रमाणात एसटीच्या गाडय़ा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने एसटी सुरू झालेली नाही.
’अनेक गावांमध्ये गेले अनेक महिने एकही गाडी धावलेली नाही. जेथे आहेत तेथेही त्यांची उपलब्धता कमी आहे.
’त्यामुळे परीक्षेची वेळ सांभाळून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठीही विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी महामार्ग ओलांडून विद्यार्थ्यांना जावे लागते.
लवकर पोहोचण्याचे आव्हान..
लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्राबाहेर तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी एक तास उपस्थित राहावे अशी सूचना देण्यात आली आहे.
सद्य:स्थिती..
राज्यात सध्या एसटीच्या १५ हजार गाडय़ांपैकी साडेतीन हजार गाडय़ा धावत आहेत. त्यांच्या दहा हजार फेऱ्या होत आहेत. अनेक गावांमध्ये एकही फेरी होत नाही. काही गावांमध्ये एखादीच फेरी होत आहे.