|| शैलजा तिवले

‘म्युकरमायकोसिस’वरील औषधाचे उत्पादन वाढविण्यात उत्पादकांना अडचणी

मुंबई : ‘म्युकरमायकोसिस’च्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या ‘एम्पोटेरेसिन-बी’ या इंजेक्शनचा राज्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून रेमडेसिवीरप्रमाणे आता हे औषध मिळविण्यासाठी वशिलेबाजीपासून ते जिल्हाधिकारी कायऱ्ालयाच्या पायऱ्या झिजविण्यापर्यत रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट सुरू आहे.

दरम्यान या औषधाच्या उत्पादनाची क्षमता मर्यादित असल्याने आणि कच्चा मालाचाही तुटवडा निर्माण झाल्याने या औषधांचे उत्पादन वाढविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यात आणखी काही कंपन्या याचे उत्पादन करतील का याची चाचपणी सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या एम्पोटेसिन बी या इंजेक्शची मागणी अनेकपटींनी वाढली आहे.  परंतु त्याचा असल्याने नातेवाईकांची धडपड सुरू आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त लोकसत्ताने १० मे रोजी प्रसिद्ध केले होते.

काय झाले?

‘एम्पोटेरेसिन इंजेक्शनचे तीन प्रकार आहे. यातील एकही प्रकार सध्या उपलब्ध नाही. सध्या राज्यात अंबरनाथची भारत सीरम आणि बीडीआर कंपनी याचे उत्पादन करत आहेत. बीडीआर कंपनी कमला लाईफ सायन्सेसकडून हे उत्पादन करवून घेते. सध्या या औषधांवर केंद्रानेही नियंत्रण आणले आहे. त्यामुळे याचे वितरण केंद्राकडूनच राज्याला केले जात आहे. मागणीच्या प्रमाणात उत्पादन  केले जात नसल्याने पुरवठाही तितक्या प्रमाणात केला जात नाही. उत्पादकांना कच्चा माल देशभरात दोन कंपन्यांकडून पुरविला जातो. एक कंपनी स्वत: कच्चा माल तयार करून पुरविते, तर दुसरी कंपनी  माल आयात करून पुरविते. दोन्ही कंपन्यांकडून कच्च्या मालाचा पुरवठाही कमी होत असल्याने उत्पादन वाढविण्यात अडचणी येत आहेत’, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.