दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचा दावा करून त्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागणाऱ्या अनिता अडवाणी हिने वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या विरोधात खन्ना यांची पत्नी व अभिनेत्री डिम्पल कपाडिया तसेच जावई अभिनेता अक्षय कुमार यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. आपण खन्ना यांची कायदेशीर पत्नी असून त्यांचा मृत्यू होईपर्यंत आपण त्यांची पत्नीच होतो. त्यांच्याशी आपले घनिष्ट संबंध असल्याचा दावा करून कुणी दुसरी महिला त्यांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागू शकत नाही, असा दावा डिम्पल हिने याचिकेत केला आहे.
आपल्या याचिकांवरतातडीने सुनावणी घेण्याची मागणी डिम्पल आणि अक्षयने केली असून याचिकेवर आता  सोमवारी सुनावणी होणार आहे. अडवाणी हिने घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत खन्ना कुटुंबियांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी डिम्पल, अक्षय, ट्विंकल आणि रिंकी खन्ना यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. अडवाणी हिने नंतर आपण तडजोडीसाठी तयार असल्याचे सांगितल्यावर खन्ना कुटुंबियाने ४ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या पाश्र्वभूमीवर डिम्पल आणि अक्षय कुमार याने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली आहे.