उच्चभ्रूंच्या कर्तव्यहीनतेमुळे पदपथांवर घाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाश्चात्त्य देशांतील स्वच्छतेची वाखाणणी करत देशातील अस्वच्छतेकडे बोट दाखवणाऱ्यांपैकी काही उच्चभ्रू मंडळींच्या कर्तव्यहीनतेमुळे ‘राणीचा रत्नहार’ समजल्या जाणाऱ्या मरिन ड्राइव्हचा पदपथ ‘घाणीचा हार’ बनू लागला आहे. पाळीव श्वानांना फेरफटका घडवून आणण्यासाठी ऐटीत मरिन ड्राइव्हवर येणारे श्वानमालक श्वानांनी केलेली विष्ठा साफ करण्याचीही तसदी घेताना दिसत नाहीत. मरिन ड्राइव्हच्या पदपथावर दररोज अनेक ठिकाणी अशी घाण पाहायला मिळत आहे.

दिवसभर घरात राहणाऱ्या श्वानांना त्यांचे मालक किंवा त्यांच्याकडे काम करणारे नोकर बाहेर फिरवून आणतात. मात्र या श्वानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, पदपथावर विष्ठा केली की ती उचलण्याचे कष्ट घेण्यास कोणी तयार नसते. पाळीव श्वानांनी केलेली विष्ठा न उचलल्यास महापालिकेच्या नियमानुसार श्वानमालकास ५०० रुपये दंड आकारला जातो. मात्र तरीही मरिन ड्राइव्हवरील ही समस्या सुटलेली नाही. दक्षिण मुंबई, वांद्रे, लोखंडवाला अशा उच्चभ्रू परिसरात ही समस्या अधिक प्रमाणात आहे.

गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, ताडदेव, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, ऑगस्ट क्रांती मैदान, पेडर रोड, नेपियन्सी रोड असा उच्चभ्रू वर्ग डी वॉर्डमध्ये येतो. या परिसरात पाळीव श्वानांची संख्याही अधिक आहे. श्वानांनी केलेली विष्ठा संबंधित केअर टेकर किंवा श्वानमालक उचलत नसल्याच्या तक्रारी आल्यावर डी विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी जून महिन्यात आठवडाभर मोहीम हाती घेतली होती. त्यात प्राण्यांची विष्ठा उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले जात होते. कारवाईनंतर श्वानांची विष्ठा उचलण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे कारवाई तीव्र करावी लागेल, असे मोटे यांनी सांगितले.

मरिन ड्राइव्हच्या समुद्रकिनाऱ्याचा बराचसा भाग ए वॉर्डमध्ये येतो. हा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी ए वॉर्डकडून विशेष कामगार नेमले जातात. मात्र श्वानांची विष्ठा उचलण्याचे काम त्यांना अधिक करावे लागते. ए वॉर्डमध्ये ३० क्लीन अप मार्शल आहेत, त्यांच्याकडून कारवाई सुरू आहे. मात्र अशा तक्रारी येत असतील तर या परिसरातील गस्त वाढवली जाईल, असे ए वॉर्डचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले.

हौस आणि गलिच्छपणा

  • ताडदेवच्या पुलावरून खाली उतरले की पदपथावरून चालताना मान खाली घालावी लागते, कारण इथे पदपथावर कुत्र्यांची विष्ठा पसरलेली असते.
  • तिथून मुंबई सेंट्रल टपाल कार्यालयाजवळही हीच परिस्थिती आहे. आरबीआय वसाहत, नवजीवन वसाहत आणि बीआयटी चाळींचा परिसर या लोकवस्ती मुलांच्या, ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी थोडय़ा मोकळ्या जागा आहेत. पण येथेही श्वानांच्या विष्ठेमुळे दरुगधी पसरल्याचे जाणवते. एवढेच नव्हे तर पदपथावर, गल्ल्यांमधून चालताना प्रत्येक पाऊल लक्ष देऊन टाकावे लागते.
  • बीआयटी चाळींच्या मागे-पुढे मैदानाच्या स्वरूपात बरीच मोकळी जागा आहे. श्वानांच्या विष्ठेमुळे या परिसरात दरुगधीही पसरते, पावसाळ्यात हाल होतात ते वेगळेच.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dirt drive of the dogs dirt
First published on: 21-08-2018 at 04:00 IST