विद्यार्थी नसल्याने व्यवसायावर परिणाम
मुंबई : महाविद्यालये सुरू होऊनही अद्याप विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक आहे. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थी येतील आणि व्यवसायाला चालना मिळेल, असा महाविद्यालयांबाहेरील कट्टय़ांवर खाद्यपदार्थ विकून उपजीविका करणाऱ्या विक्रेत्यांचा समज झाला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या जेमतेम उपस्थितीमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
महाविद्यालयांचे दार खुले झाले असले तरी अद्याप सर्व वर्ग सुरू झाले नाहीत. त्यामुळे मोजकेच विद्यार्थी महाविद्यालायत येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गजबजणारे महाविद्यालयांबाहेरील कट्टे अजूनही सुनेच आहे. परिणामी कट्टय़ांवर विद्यार्थीच नसल्याने तेथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना इतर ग्राहकांवर समाधान मानावे लागत आहे.
रुईया, पोद्दार महाविद्यालयाजवळ मिळणारे सुभाष सँडविच, खालसाची फ्रँकी, विलेपाल्र्यातील बाबूचा वडापाव, मिठीबाई शेजारील खाऊगल्ली, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स बाहेरील शेवपुरी अशी निरनिराळी खासियत असलेले खाद्यपदार्थाचे विक्रेते प्रत्येक महाविद्यालयाशी जोडले गेले आहे. वर्षांनुवर्षे हे विक्रेते तिथे व्यवसाय करीत आहेत. काही विक्रेते ५० वर्षांहून अधिक काळ तेथे व्यवसाय करीत आहेत.
गेल्या दोन वर्षांत महाविद्यालये बंद असल्याने या विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. महाविद्यालये सुरू होण्याची वार्ता येताच त्यांनी कंबर कसली. परंतु विद्यार्थीच नसल्याने मनासारखा व्यवसाय होत नसल्याची खंत या विक्रेत्यानी व्यक्त केली.
गेली ३३ वर्षे मी रुईया, पोद्दारच्या बाहेर सँडविच विकत आहे. विद्यार्थी आले तर आमचा व्यवसाय, अशी स्थिती आहे. करोनाकाळात दीड वर्षे आम्ही गावी होतो. आता व्यवसायाला चालना मिळेल अशी आशा होती, परंतु अद्याप विद्यार्थी आलेले नाहीत. महाविद्यालयांना पूर्वीसारखे वैभव येवो याचीच आम्ही वाट पाहतोय.
– सुभाष, सँडविच विक्रेते
विद्यार्थ्यांशी नाते
‘कीर्तीचा वडापाव’ मुंबईभर पोहोचवणारे हेच विद्यार्थी आहेत. गेल्या ४० वर्षांत लाखो विद्यार्थ्यांशी आमचे नाते जुळले आहे. काही माजी विद्यार्थी आजही कुटुंबासह वडापाव खायला येतात. करोनाकाळात इतर ग्राहकांवर व्यवसाय सुरू असला तरी विद्यार्थ्यांची कमतरता वारंवार भासत होती. विद्यार्थी परत आल्याने व्यवसायाला शोभा आली. आता तो प्रतिसाद वाढण्याची प्रतीक्षा असल्याचे कीर्ती महाविद्यालय येथील विक्रेते अशोक ठाकूर यांनी सांगितले.