वृक्षप्राधिकरण समितीने प्रस्ताव फेटाळला; शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादी तटस्थ

‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी आरे वसाहत परिसरात उभारण्यात येणाऱ्या कारशेडच्या जागेची पाहणी करीत वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बुधवारी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव नामंजूर करीत प्रशासनाकडे परत पाठवून दिला. मोठय़ा प्रमाणावर झाडांची कत्तल करण्याऐवजी ‘मेट्रो-३’ची कारशेड भूमिगत बांधावी, असा सल्ला देत शिवसेनेने काही मुद्दे उपस्थित करीत त्यांची उत्तरे सादर करण्याची मागणी बैठकीत केली. आरेतील कारशेडच्या मुद्दय़ावर कालपर्यंत शिवसेनेला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी बैठकीत तटस्थ भूमिका घेत आपली वेगळी चूल मांडली. तर भाजप सदस्यांनी सावध भूमिका घेतली.

‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी आरे वसाहत परिसरातील ३,६९१ पैकी २,२३८ वृक्ष तोडण्याचा आणि ४६४ वृक्षांचे पुनरेपण करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर सादर करण्यात आला आहे. आरे वसाहतीमधील वृक्षतोडीला केलेल्या विरोधावर ठाम राहिलेल्या शिवसेनेने कारशेडच्या जागेची पाहणी करण्याची मागणी केली होती. वृक्ष प्राधिकरण समितीमधील शिवसेनेसह अन्य सदस्यांनी मंगळवारी कारशेडच्या जागेची पाहणी केली. त्याच वेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले होते. या पाश्र्वभूमीवर बुधवारच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला आला होता.

वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये शिवसेना सहा, भाजप चार, काँग्रेस दोन, राष्ट्रवादी एक, न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेले पाच तज्ज्ञ सदस्य असे संख्याबळ आहे. शिवसेनेकडून आरेमधील वृक्षतोडीला होणाऱ्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. संख्याबळ कमी असल्याने भाजपने बैठकीमध्ये जपून पावले टाकली. आक्रमक भूमिका न मांडता आरेमध्ये नियोजित स्थळी कारशेड उभारण्याची गरज असल्याचे भाजप नगरसेवकांनी नमूद केले. आरेमधील कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास कालपर्यंत शिवसेनेला काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. मात्र बुधवारच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची साथ सोडत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावण्यात येतील असे मेट्रोकडून सांगण्यात येत आहे. मात्र ही झाडे नेमकी कुठे लावणार याचा खुलासा करावा. या वृक्षतोडीबाबत ८२ हजार नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. या नागरिकांची सुनावणी घेण्यात आली का? सुनावणीदरम्यान त्यांचे समाधान झाले का? आदिवासींच्या उपजीविकेचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार? पिढय़ान्पिढय़ा आरेमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासींचे पुनर्वसन कुठे करणार? असे अनेक मुद्दे यशवंत जाधव यांनी उपस्थित केले.

मुंबईच्या आधीच्या २०३४च्या विकास आराखडय़ात आरेमध्ये कारशेडचे आरक्षण दाखविण्यात आले नव्हते. मात्र त्रिसदस्यीस समितीने नमूद केल्यानंतर हे आरक्षण विकास आराखडय़ात दाखविण्यात आले. म्हणजे तेथे पूर्वी कारशेडचे आरक्षण नव्हते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर झाडांची कत्तल करण्याऐवजी आरेमध्ये भूमिगत कारशेड उभारावी. शिवसेनेचा वृक्षतोडीला कायमच विरोध असेल, असेही त्यांनी सांगितले. प्रस्ताव अपूर्ण असून उपस्थित केलेल्या मुद्दय़ांची समाधानकारक उत्तरे सादर करावी. त्यानंतर या प्रस्तावाचा विचार करण्यात येईल, असे स्पष्ट करीत यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. परिणामी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी अखेर हा प्रस्ताव नामंजूर केला. आता हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ‘मेट्रो-३’च्या कारशेडची उभारणी अधांतरित आहे.

तज्ज्ञांची भूमिका गुलदस्त्यात

तज्ज्ञ सदस्यांनी काही वृक्ष वाचणे शक्य असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.