मुंबई:महाराष्ट्राबरोबर तेलंगणाची सुमारे एक हजार कि.मी.ची सीमा असून, राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली असता महाराष्ट्राच्या सख्ख्या शेजाऱ्याला जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी संबंधित क्षेत्रांत सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली.

महाराष्ट्र व तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आंतरराज्य प्रश्नांच्या संदर्भातही चर्चा झाली. तेलंगणातील बाभळी बंधारा तसेच अन्य काही सिंचन प्रकल्पांमुळे राज्याचे नुकसान होत असल्याकडे महाराष्ट्राने यापूर्वी लक्ष वेधले होते. आजच्या चर्चेत दोन्ही मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली.

 दोन राज्यांमध्ये हजार कि.मी. ची सीमा असल्याने उभय राज्यांना मैत्रीची भावना जपावी लागेल, अशी अपेक्षा चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली.

बाभळी बंधारा, तुम्मीदीहेटी, मेडीगड्डा बॅरेज, चन्खा-कोरटा बॅरेज या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच उभय राज्यात सुरू असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.  जलसिंचन प्रकल्पांतील आंतरराज्यीय सहकार्य आणि त्यातील विविध तरतुदींबाबतही यावेळी विस्ताराने ऊहापोह करण्यात आला. दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.

Story img Loader