scorecardresearch

“संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं की, यापुढे दिशा सालियन प्रकरणावर…”; नितेश राणेंनी मानले मुंबईच्या महापौरांचे आभार

“याच महापौरांनी काही महिन्यांअगोदर त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात याची घोषणाही करुन टाकली.”

kishori pednekar nitesh rane
ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत राणेंनी साधला निशाणा (फाइल फोटो)

अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता भाजपाचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधलाय. उपहासात्मक टीका करताना नितेश राणेंनी किशोरी पेडणेकर यांचे आभार मानलेत.

“एका पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊतांनी महापौर किशोरी पेडणेकरांना ठणकावून सांगितलं की यापुढे दिशा सालियन प्रकरणावर बोलू नका. पण महापौर काही तिथे थांबल्या नाहीत. त्यांना राज्य महिला आयोगाला पत्रही लिहिलं. त्याचबरोबर त्या काल जाऊन त्या दिशा सालियनच्या कुटुंबियांना भेटल्याही,” असं नितेश राणेंनी म्हटलंय.

नक्की वाचा >> नवाब मलिक ईडी चौकशी : २०२४ चा इशारा देणाऱ्या राऊतांना नितेश राणेंचा टोला; म्हणाले, “यापुढे तुम्ही आपली…”

पुढे बोलताना, “याच महापौरांनी काही महिन्यांअगोदर त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात याची घोषणाही करुन टाकली. आता महापौरताईंचा हा सगळा उत्साह कदाचित अदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षात केलेल्या ४५ वर्षांवरील लोकांना तिकीट मिळणार नाही या छुप्या घोषणेमुळे तर नाही ना?, या दिशा सालियन प्रकरणामध्ये राजकारण हे शिवसेनेच्या अंतर्गत सत्ता संघर्षामुळेच आहे,” असा टोला नितेश राणेंनी लगावलाय.

नक्की वाचा >> दिशा सालियन प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? विचारणाऱ्या नितेश राणेंना रुपाली चाकणकरांचं उत्तर, म्हणाल्या…

ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बोलताना नितेश राणेंनी शेवटी उपहासात्मकरित्या महापौरांचे आभार मानलेत. “आपल्याला आठवत असेल की रमेश किणीचं प्रकरणातील बातम्या माननीय राज ठाकरेंची शिवसेनेमधील घोडदौड थांबवण्यासाठी बाहेर काढण्यात आल्या. तसेच अदित्य ठाकरेंच्या युवासेनेला थांबवण्यासाठी हे होताना दिसतंय. असो स्वार्थासाठी का असेना महापौरताईंनी आमच्या या लढ्याला पाठिंबा दिला. दिशा सालियन न्याय मिळून देण्यासाठी पुढाकार घेतला यासाठी त्यांचे आभार,” असं नितेश राणे म्हणालेत.

किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिल्यानंतर आयोगाने मालवणी पोलिसांना दिशा सालियन प्रकरणामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disha salian case nitesh rane thanked mumbai mayor kishori pednekar scsg