सुहास जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्मचाऱ्यांची कमतरता, उपनगरी रेल्वे सुविधा सर्वासाठी नसल्याने ग्राहक मिळण्याची शक्यता कमी अशा अडचणींमुळे अनेक खाणावळी आणि भोजनालयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोजक्याच खाणावळी आणि थाळी भोजनालये सुरू झाली असून ५० टक्के बंदच असल्याचे दिसून येते.

शिथिलीकरणाच्या प्रक्रियेत राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून मर्यादित ग्राहक आणि इतर निर्बंधांसहित उपाहारगृहांना परवानगी दिली. त्यानंतर उपाहारगृहे मर्यादित प्रतिसादात सुरू झाली, मात्र खाणावळी आणि भोजनालयांच्या थाळ्या अद्याप रिकाम्याच आहेत.

सरकारी/खासगी कार्यालयांची गर्दी असलेली ठिकाणे, व्यापारी संकुले, बाजारपेठा अशा ठिकाणी खाणावळी आणि थाळी सुविधा या मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. स्थानिकांपेक्षा कामासाठी, खरेदीसाठी बाहेरून येणारे हे त्यांचे हमखास ग्राहक. काही ठिकाणी मासिक सदस्यता, तर काही ठिकाणी टिफिन सुविधा असते. इतर उपाहारगृहांप्रमाणे पार्सल सुविधा मर्यादित असते.

‘आमचा बहुतांश ग्राहक हा स्थानिक नसून बाहेरून येणारा आहे. तोच अद्याप पूर्णपणे कार्यरत झालेला नाही. त्यातच कर्मचारी वर्गदेखील मर्यादित आहे, त्यामुळे खाणावळ सुरू करणे शक्य नसल्याचे,’ फोर्टमधील साबर भोजनगृहचे पिनाकिन भट्ट यांनी सांगितले. इतर उपाहारगृहांप्रमाणे आमची रचना नसल्याने मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये भोजनगृह सुरू करणे शक्य नाही. तसेच थाळी पार्सल देण्यात आणि ग्राहकाला देखील पार्सल भोजन जेवण्यात आनंद मिळत नाही. टेबलवर पूर्ण जेवण हाच यातील आनंद आहे, असेही भट्ट यांनी नमूद केले.

‘भोजनालय सुरू करणे सध्या शक्य नसल्याने आम्ही पार्सल सुविधेचा पर्याय स्वीकारला. कुरिअरमार्फत घरपोच सुविधादेखील देण्यास सुरुवात केली. मात्र त्यास केवळ २० ते २५ टक्केच प्रतिसाद असल्याचे,’ श्रीकृष्ण बोर्डिगचे सतीश रमा नायक यांनी सांगितले.

शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये पोटभर जेवण देणाऱ्या गुजराती, राजस्थानी खाणावळी मोठय़ा प्रमाणात आहेत. बाजारपेठांमधील अशा खाणावळींना गेल्या महिनाभरात सुमारे ५० टक्के प्रतिसाद आहे. ‘एरवी रोज दिवसाला २०० ग्राहक आमचे सदस्य आहेत, त्यापैकी सध्या १२५ ग्राहक नियमित येत असल्याचे,’ दादर हिंदमाता येथील पिआनो लंच होमचे युवराज वडेर यांनी सांगितले.

अमर्याद थाळी देणे न परवडणारेच

तीस-चाळीस पदार्थाची अमर्याद भोजन असणारी थाळी देणारी भोजनालयेदेखील अद्याप सुरू झाली नाहीत. ‘कर्मचारी कमतरता हा मुद्दा आहेच, पण ग्राहकांची संख्या मर्यादित असेल तर ही व्यवस्थाच कार्यरत होऊ शकत नाही. दिवसाला किमान दोनशे ग्राहक येतील तेव्हाच अशी थाळी सुविधा देणे व्यवहार्य ठरेल,’ असे चौपाटी येथील ‘रिव्हायवल’चे कमलेश बारोत यांनी सांगितले.

८० वर्षांत प्रथमच ‘पदार्थ सारणी’

खाणावळ अथवा थाळी भोजनालयात ‘पदार्थ सारणी (मेन्यू कार्ड)’ नसते. दिवसानुसार ठरलेली थाळी हाच येथील शिरस्ता. १९३६ साली सुरू झालेले दादर (प.) येथील श्रीकृष्ण भोजनालय आणि १९४२ चे माटुंगा (पू) येथील उडुपी श्रीकृष्ण बोर्डिग या ठिकाणीदेखील हीच पद्धत आहे. ‘टाळेबंदीनंतर नेहमीच्या थाळीशिवाय वेगळ्या भाज्यांसह मर्यादित ‘कॉम्बो मील’चा पर्याय देण्याची तसेच घरपोच सुविधादेखील सुरू केल्याचे आणि त्यासाठी प्रथमच मेन्यू कार्डही उपलब्ध करून देण्यात आल्याचे,’ श्रीकृष्ण भोजनालयाचे राहुल पाटगावकर यांनी सांगितले. तर ‘ग्राहकांना पार्सलसाठी सोयीस्कर व्हावे म्हणून इतक्या वर्षांत प्रथमच थाळीमध्ये बदल केल्याचे,’ सतीश रमा नायक यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dishes in the canteen and restaurant are empty abn
First published on: 07-11-2020 at 00:12 IST