दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रोह्याजवळ झालेला अपघात वेल्डिंग तुटल्यामुळेच झाल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या चौकशीत पुढे येत आहे. या अपघातामागे बोगद्यात वेगमर्यादा ओलांडणे किंवा रेल्वे डब्यांतील बिघाड हे कारण नव्हते. अपघाताच्या ठिकाणाहून गाडी जात असताना गाडीला जोरदार हादरा बसला आणि गाडीचे डबे घसरले, असे या चौकशीत समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे आठवडाभराची मुदत मागितली आहे. त्यामुळे आता २८ मे रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत चौकशी होणार असून त्यानंतर याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी ४ मे रोजी रोहा आणि नागोठणे या दरम्यानच्या बोगद्यात घसरली. या अपघातात २३ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. मात्र अपघाताचे कारण त्या वेळी स्पष्ट होत नव्हते. रेल्वेरुळांमध्ये वेल्डिंग फ्रॅक्चर असल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी पाहणीवरून दिसत होते. तर नंतर इंजिन चालकांनी बोगद्यातील वेगमर्यादा ओलांडल्यामुळे अपघात झाला का, कोकण रेल्वेचे डबे खराब असल्यामुळे अपघात झाला, या तर्कवितर्काना उधाण आले होते. त्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी कोकण रेल्वेकडून या डब्यांच्या देखभालीचा अहवालही मागवला होता.
चौकशीदरम्यान बक्षी यांनी ३० पेक्षा जास्त लोकांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. यात रेल्वे अधिकारी, प्रवासी यांच्यासह दोन इंजिन चालकांचाही समावेश आहे. या बोगद्यात पाच अंशाचा कोन असून ताशी ५५ किलोमीटरची वेगमर्यादा आहे. या वेगमर्यादेचे उल्लंघन करण्यात आले नव्हते, असे या चालकांनी सांगितले. गाडी बोगद्याबाहेर पडताना अचानक जोरदार झटका बसला आणि गाडीचे डबे इंजिनासह फेकले गेले, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. तसेच बक्षी यांनीही याबाबत तपासणी केली असता वेगमर्यादेचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा अपघात वेल्डिंग तुटल्यामुळेच झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला.