अभिषेक तेली, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले असून दहीहंडी, मराठी गरबा यानंतर आता मतदारांच्या घरी भाजपतर्फे फराळाचे वाटप करण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर नजर ठेवून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि भेटवस्तू वाटपाचा धडाका सुरू आहे. घरोघरी फराळाचे वितरण करून जनसंपर्क वाढविण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.

वरळी विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात मराठी लोकसंख्या आहे. हेच मराठी मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप सणांची संधी साधून मतदारांना आकर्षित करू पाहात आहे. वरळी, शिवडी हे शिवसेनेचे वर्चस्व असलेले मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. मराठी अस्मिता हा मुद्दाही शिवसेनेच्या जिव्हाळय़ाचा. या दोन्ही मुद्दय़ांना धरून भाजपने तेथे शिरकाव केल्याचे दिसत आहे.

आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून आतापर्यंत या विभागातील १५ हजार घरांमध्ये चिवडा, लाडू, शंकरपाळे, चकली अशा फराळाची पाकिटे भाजपने वितरीत केली आहेत. भाजपच्या जाहिरातींमध्येही मराठी अस्मितेचा उल्लेख अगदी आवर्जून, ठळकपणे केला आहे.

महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदू सण साजरे करण्याचा विसर पडला होता. करोनानंतर आपले हिंदू सण जल्लोषात साजरे व्हावेत आणि त्यात मोठय़ा प्रमाणात नागरिक सहभागी व्हावेत, यासाठी आम्ही सणांच्या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करीत आहोत, असे भाजपचे महाराष्ट्र सचिव संतोष पांडे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali faral distribution by bjp in aditya thackeray s worli assembly constituency zws
First published on: 21-10-2022 at 04:32 IST