प्रशासन-सत्ताधाऱ्यांच्या निर्णयामुळे डॉक्टर चिंतित

डॉक्टरांना झालेल्या विषबाधेचा ठपका ठेवण्यात आलेल्या कंत्राटदारालाच लोकमान्य टिळक (शीव) रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना पौष्टिक आहार पुरविण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बैठकीत सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. एकाही नगरसेवकाने या कंत्राटदाराविषयी चकार शब्दही काढला नाही. या कंत्राटदाराकडून पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्यात येणार असल्याने डॉक्टरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सतत रुग्णांच्या संपर्कात राहणाऱ्या डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याने त्यांना पौष्टिक आहार पुरविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार शीव रुग्णालयातील ६३० निवासी डॉक्टर आणि अन्य डॉक्टरांना प्रतिदिन २५ रुपये दराने पौष्टिक आहार उपलब्ध करण्यात येणार असून पुढील दोन वर्षांमध्ये पौष्टिक आहारासाठी १,१४,९७,५०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे काम मिळविण्यासाठी अन्नपूर्णा कॅटरिंग सव्‍‌र्हिसेस आणि कुमार फुड्स मॅनेजमेन्ट सव्‍‌र्हिसेस या दोघांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यापैकी लघुत्तम दर असलेल्या अन्नपूर्णा कॅटरिंग सव्‍‌र्हिसेसला डॉक्टरांना पौष्टिक आहार पुरविण्याचे कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अन्नपूर्णा कॅटरिंग सव्‍‌र्हिसेसबाबत डॉक्टरांना १५ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या विषबाधेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या निर्णयात ही कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्याबरोबर केलेले कंत्राट तत्काळ रद्द करण्यात येईल, असे प्रशासनाने प्रस्तावात स्पष्ट म्हटले आहे. मात्र असे असतानाही स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत एकाही नगरसेवकाने अन्नपूर्णा कॅटरिंगला हे काम देऊ नये असा आक्षेप घेतला नाही. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा प्रस्ताव पुकारला आणि तत्काळ मंजूरही करून टाकला.

डॉक्टरांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना प्रथिनेयुक्त पौष्टिक आहार देण्याची योजना पालिकेने हाती घेतली आहे. मात्र न्यायप्रविष्ट असलेल्या विषबाधेबाबतच्या प्रकरणातील कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यात आल्याने डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार पुरविण्याची योजना जाहीर करायची आणि दुसरीकडे विषबाधेचा ठपका असलेल्या कंत्राटदाराला पौष्टिक आहार पुरविण्याचे कंत्राट द्यायचे, यावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची नेमकी भूमिका स्पष्ट होत नाही. मात्र हा डॉक्टरांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे, असा आरोप डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.