राज्य सरकारच्या विशेष समितीकडून पाहणी; रुग्णालयाचा बेजबाबदारपणा उघड
देशभरात ५०० आणि १००० रुपयांची नोटाबंदी घोषित केल्यानंतर उपचार करण्यास नकार दिल्याप्रकरणी गोवंडीतील एका खासगी नर्सिग होममधील डॉक्टर राज्य सरकारच्या विशेष समितीच्या पाहणीनूसार दोषी आढळली आहे. रुग्णालयाची चौकशी करणाऱ्या विशेष समितीचा अहवाल राज्य आरोग्य विभागाकडे देण्यात येणार असून लवकरच डॉक्टरच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर अनेक खासगी रुग्णालयात या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. किरण शर्मा या आठ महिन्यांची गर्भवती गोवंडी येथील जीवन ज्योती नर्सिग होममधील डॉ. शीतल कामत यांच्याकडे उपचार घेत होती.
९ नोव्हेंबर रोजी अचानक किरण यांनी गर्भकळा सुरू झाल्या आणि घरातच बाळाचा जन्म झाला. त्यामुळे किरण यांच्या पतींनी तातडीने ज्योती नर्सिग रुग्णालयात धाव घेतली. या वेळी रुग्णालयाकडून ६००० रुपये भरण्यास सांगितले होते.
मात्र ही रक्कम ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये असल्याकारणाने डॉ. शीतल कामत यांनी स्वीकारण्यास नकार दिला. यामध्ये जन्मजात बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणात रुग्णालयाच्या चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये डॉ. बी. डी. पवार उपसंचालक, आरोग्य विभाग, जे.जे. रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ, पालिकेचे आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता. समितीच्या अहवालात दिल्याप्रमाणे सीसीटीव्हीच्या दृश्यानुसार किरण शर्मा यांच्या पतीने डॉ. शीतल कामत यांना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा देत असल्याचे समोर आले आहे.
विशेष समितीचा अहवाल आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना देण्यात येईल आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल असे, डॉ. सतीश पवार, संचालक, महाराष्ट्र आरोग्य विभाग यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
कठोर कारवाई करणार : डॉ. पवार
एका नर्सिग होममध्ये नवजात बालकावर उपचार करण्यास नकार दिल्याप्रकरणी गोवंडी येथील एक डॉक्टर यात दोषी आढळली असून राज्य आरोग्य विभागाच्या तपासणीनंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.