प्रशासन, शिवसेनेचा भाजप नगरसेवकांकडून निषेध

न्यायालयाचे आदेश धुडकावून, तसेच पालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसला केराची टोपली दाखवत रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी सुरू ठेवलेल्या संपामुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले. रुग्णालयातील वास्तवाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत निवेदन करण्यात अपयशी ठरलेल्या पालिका प्रशासनाला भाजपच्या पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी फैलावर घेतले. तर प्रशासनावर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयशी ठरलेली सत्ताधारी शिवसेना आणि जबाबदारीचे भान नसलेल्या प्रशासनाचा निषेध करीत भाजपचे पहारेकरी स्थायी समितीतून निघून गेले. स्थायी समितीच्या दुसऱ्या बैठकीतही भाजपच्या पहारेकऱ्यांनी शिवसेनेवर मात केली.

रुग्णांना वेठीला धरुन निवासी डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला होता. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या असंख्य रुग्णांचे अतोनात हाल झाले.

अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या. त्यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली. याबाबत प्रशासनाने सविस्तर निवेदन करावे, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत केली. बैठकीच्या सुरुवातीलाच प्रशासनाने याबाबत निवेदन करायला हवे होते वा स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी तसे आदेश प्रशासनाला द्यायला हवे होते. मात्र बैठक संपण्यापूर्वी निवेदन करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली.

बैठक संपण्यापूर्वी निवेदन करण्याचे आदेश रमेश कोरगावकर यांनी दिले. मात्र अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे निवेदन करण्यात अपयशी ठरल्या. त्यामुळे भाजपचे पहारेकरी आणि काँग्रेस, समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत पालिका आयुक्त अजोय मेहता यांना बैठकीत बोलावण्याचे आदेश दिले. दहा मिनिटे झाल्यानंतरही आयुक्त बैठकीत उपस्थित न झाल्यामुळे आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घटिका समीप येऊ लागताच बैठक आटोपण्याची घाई शिवसेनेला झाली होती; मात्र महत्त्वाच्या विषयावर माहिती मिळेपर्यंत सभागृहातच बसून राहण्याचा पवित्रा मनोज कोटक, काँग्रेसचे गटनेते रवी राजा, समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी घेतल्यामुळे शिवसेना अडचणीत आली. संपाबाबतची सविस्तर माहिती देत नाही, तोपर्यंत स्थायी समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा सभागृह नेते यशवंत जाधव यांनी घेतला.

रुग्णांना मदत करण्याचे भाजपचे आदेश

डॉक्टरांच्या संपामुळे परिस्थिती चिघळू लागली असून रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे आपापल्या प्रभागांमधील पालिका रुग्णालयांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. गरजेनुसार रुग्णांना मदत करावी, असे आदेश भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिले. पालिका रुग्णालयांमध्ये जातीने जाऊन पहारेकऱ्याची भूमिका बजावून रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असेही कोटक यांनी भाजप नगरसेवकांना सूचित केले आहे.