डॉक्टरांनी रुग्णाला औषधचिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) देताना त्यावर औषधाचे जेनेरिक नाव लिहावे, अशा आशयाचे सूचनापत्रक महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडून काढण्यात आले आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने डॉक्टरांसाठी अशाप्रकारचे सूचनापत्रक काढले होते. मात्र औषध कंपन्यांसोबतचे लागेबांधे, जेनेरिक औषधांवरील अविश्वास अशा अनेक कारणांमुळे डॉक्टरांकडून औषधाचे जेनेरिक नाव लिहिण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी चर्चा सध्या वैद्यकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

महाराष्ट्र वैद्यक परिषदेने काढलेल्या सूचनापत्रकात रुग्णांच्या औषधचिठ्ठीवर मोठय़ा अक्षरात औषधाचे जेनेरिक नाव लिहावे,  अशी सूचना डॉक्टरांना देण्यात आली आहे. रुग्णांकडून यासंदर्भात तक्रार आल्यास डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही या सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे. गरीब रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारी पातळीवर अनेक ठिकाणी जेनेरिक औषधांचे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र औषधचिठ्ठीवर औषधाचे जेनेरिक नाव लिहिण्यास डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.

डॉक्टर आणि औषध कंपन्यांमध्ये लागेबांधे असतात. औषधांचा खप वाढावा यासाठी डॉक्टर व औषध कंपन्यांमध्ये हितसंबंध असतात. यामोबदल्यात डॉक्टरांना परदेश सहली, महागडय़ा वस्तू यांसारख्या आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात, असा आरोप महाराष्ट्र फार्मसी संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास तांदळे यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत तर औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना २० ते ३० टक्के कमिशन देण्याची प्रथा सुरू झाली आहे, असेही डॉ. तांदळे यांनी सांगितले. जेनेरिक औषधे ही इतर ब्रॅंडप्रमाणेच गुणकारी असतात. मात्र हव्यासापोटी डॉक्टर औषधांचे जेनेरिक नाव लिहून देत नाहीत. महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडून याबाबत सूचनाच देण्यात आली आहे. यासंदर्भात कडक कायदे केल्याशिवाय रुग्णांना स्वस्त दरातील जेनेरिक औषधे मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

  • सध्या डॉक्टरांनी औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. चिकित्सालयाच्या शेजारीच डॉक्टर स्वत:चे औषधांचे दुकान सुरू करतात. आणि आलेल्या रुग्णांना तेथेच औषध घेण्यास सांगितले जाते, असेही एका वरिष्ट तज्ज्ञांनी सांगितले. डॉक्टरांनी रुग्णांना दिलेल्या औषधचिठ्ठीमध्ये औषधांचे जेनेरिक नाव लिहिणे हा डॉक्टरांच्या आचारसंहितेचा भाग आहे. मात्र केवळ सूचना काढून परिणाम होणार नाही तर त्यासाठी सरकारी यंत्रणेत सुधारणा आणण्याची आवश्यकता आहे, असे जनआरोग्य भियानाचे डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगितले. अनेकदा डॉक्टरांकडून जेनेरिक औषधांची गुणवत्ता चांगली नसल्याचा युक्तिवाद केला जातो. काहीअंशी ते योग्यही आहे. मात्र सर्वज जेनेरिक औषधे दर्जाहीन नसतात. त्यामुळे जेनेरिक औषधांची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.