ताडदेव आगीनंतर समितीची महत्त्वपूर्ण शिफारस

मुंबई : बहुतांशी गृहनिर्माण संस्था सुरक्षिततेच्या कारणास्तव इमरातींच्या गच्चीचा दरवाजा बंद ठेवतात. मात्र हा दरवाजा कुलूपबंद ठेवू येऊ नये, असे पालिका प्रशासनाने सूचित केले आहे. आपत्कालीन प्रसंगी गच्चीचा वापर करता येऊ शकतो, आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना गच्चीवर पोहोचणे सहज शक्य होईल व आगीपासून स्वत:चे संरक्षण करता येईल. त्यामुळे गच्चीचा दरवाजा बंद ठेवू नये असे बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीला ताबा देताना सूचित करावे, असे ताडदेव आगीच्या दुर्घटनेशी संबंधित अहवालातील शिफारशीत म्हटले आहे.

ताडदेवच्या ‘सचिनम हाईटस’ इमारतीतील भीषण आगीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून काही दूरगामी उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यात ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब नोंदवली आहे. अनेक सोसायटय़ा व गगनचुंबी इमारतींमध्ये गच्चीचा दरवाजा रहिवाशांमधील अंतर्गत भांडणांमुळे किंवा सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येतो. याबाबतचे धोके अहवालात स्पष्ट करून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

व्यावसायिकाने सदनिकाधारकास ताबा प्रमाणपत्र देताना अग्निसुरक्षा तपासणीची जबाबदारी सदनिकाधारकांची असल्याचे ताबा प्रमाणपत्रात नमूद करावे, असेही त्यात म्हटले आहे. पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विकासकाने नवीन गृहनिर्णाण संस्थेला नियमित अग्निसुरक्षा तपासणीबाबत लेखी सूचना द्यावी व त्याची पोचपावती अग्निशमन दलास द्यावी, अशी नवीन अट घालण्यात आली आहे. ताडदेवच्या आग प्रकरणातील इमारतीच्या रहिवाशांनी अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करून प्रमाणपत्र सादर केले नव्हते. अंतर्गत सजावटीचे काम करणाऱ्यांची पालिकेकडे नोंदणी करावी. मुंबईत भविष्यात सदनिकांमध्ये होणारी कामे नोंदणीकृत सजावटकारांकडून करावी, असेही अहवालात सूचवण्यात आले आहे.

दोन वर्षांचा करार करणे बंधनकारक

अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र वर्षांतून दोनदा सादर करण्यास अनेक सोसायटय़ा कुचराई करतात. त्यामुळे त्यादृष्टीनेही या शिफारशींमध्ये नवीन नियम तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर अग्निशमन अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या यादीतील अग्निसुरक्षा तपासणाऱ्या संस्थेशी विकासकाला दोन वर्षांचा करार करणे बंधनकारक करण्याची नवीन अट आयओडीमध्ये समाविष्ट करावी, असेही अहवालात म्हटले आहे.