ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा रे यांचे आवाहन
इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांकडून सातत्याने भारतीयांवर सत्ता गाजवली जाते. कारण आपणच आपल्या प्रादेशिक भाषेविषयी आग्रही नसतो. परदेशातील भाषातज्ज्ञ आपल्या देशातील प्रादेशिक भाषांचा अभ्यास करतात. त्यामुळे आपण इंग्रजीचे ओझे वाहण्यापेक्षा मातृभाषेत लिखाण करावे, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या आणि उडिया भाषेतील साहित्यिक प्रतिभा रे यांनी शनिवारी केले. ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स’ (एनसीपीए) येथे एलआयसी ‘गेटवे लिटफेस्ट’ महोत्सवात ‘भारतीय इंग्रजी साहित्याचे वर्चस्व पाहता प्रादेशिक भाषांमधील साहित्याचा विकास होत आहे का?’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या वेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि उडिया सहित्यिक सीताकांत महापात्रा, गुजराती साहित्यिक सीतांशू यशश्चंद्र, मल्याळम साहित्यिक एन. एस. माधवन, बंगाली साहित्यिक सुबोध सरकर आणि विख्यात चित्रपट निर्माते अदूर गोपलकृष्णन हे मान्यवर उपस्थित होते.
भारतीयांनाच आपल्या इतर प्रादेशिक भाषांविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे बंगाली साहित्यात काय लिहिले जात आहे, याची माहिती गुजराती किंवा मराठी भाषेत लिखाण करणाऱ्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे भारतीयांनी प्रादेशिक भाषेतील साहित्याचा जास्तीत जास्त अनुवाद केला पाहिजे, असे मत प्रतिभा रे यांनी व्यक्त केले. प्रादेशिक भाषा या अभिजात आहेत. त्यामुळे त्यात लिखाण करणे, अभिमानाचे मानले जावे, असे उडिया सहित्यिक सीताकांत महापात्रा म्हणाले.
सध्या देशात इंग्रजीचा प्रचंड गाजावाजा होत आहे. मात्र ज्या भाषेचा इतका गाजावाजा होत आहे, ती भाषा देशात आजपासून २५० वर्षांपूर्वी कोणालाही येत नव्हती. आपल्या प्रादेशिक भाषा या किमान तीन हजार वर्षांपासून आहेत. त्याचा उत्सव करण्याची गरज असल्याचे मत गुजराती साहित्यिक सीतांशू यशश्चंद्र यांनी मांडले. तर इंग्रजी भाषेच्या विरोधात बोलण्यापेक्षा प्रादेशिक भाषांमध्ये असणारी निरक्षरता कमी करण्याकडे भर दिला जावा, असा सल्ला मल्याळम साहित्यिक एन. एस. माधवन यांनी दिला.