बातम्या सांगण्याची विशेष शैली, भारदस्त आवाज ही ओळख
मुंबई : दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बरोबर साडेसात वाजता ‘नमस्कार.. आजच्या ठळक बातम्या’ या आवाजाने लोकांची मने जिंकून घेणारे प्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंधेरीतील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. बातम्या सांगण्याची विशेष शैली आणि भारदस्त आवाज ही भिडे यांची ओळख होती.




गेले पाच- सहा वर्षे प्रदीप भिडे कर्करोगाशी झुंज देत होते. आवाजाच्या जोरावर सांस्कृतिक- कला विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अनेक महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक घटनांचे साक्षीदार असलेल्या भिडे यांच्या निधनाने आवाजाचे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त होते आहे.
मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात १९७२मध्ये झाली आणि १९७४ साली प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदक म्हणून पहिले बातमीपत्र वाचले. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या जन्माबरोबरच त्यांचा वृत्तनिवेदक म्हणून सुरू झालेला प्रवास हा अगदी २०१६ पर्यंत सुरू होता. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले भिडे यांनी पुण्यात रानडे इन्स्टिटय़ूटमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. रानडेमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असतानाच दूरदर्शन केंद्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते दूरदर्शनवर प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक म्हणून काम करू लागले. मुंबई दूरदर्शन केंद्राचे तत्कालीन संचालक शास्त्री यांनी भिडे यांचा आवाज ऐकला आणि त्यांना वृत्तनिवेदक होण्याविषयी विचारणा केली. वृत्तनिवेदक म्हणून १९७४ पासून त्यांचा आवाज आणि त्यांचा चेहरा महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात कोरला गेला आहे.
अत्यंत संयमी, तटस्थ वृत्तीने बातम्या सांगतानाही आवाजात चढ-उतार करणे, बातम्यांतील आशयानुसार आवाजात मार्दव-कठोरता आणणे ही त्यांची खासियत होती. वृत्तनिवेदक म्हणून ते कार्यरत राहिलेच, पण एक क्षण असा आला जेव्हा त्यांनी त्यांची बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडली आणि ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ नावाने स्वत:चा ध्वनिमुद्रण स्टुडिओ आणि निर्मितीसंस्था सुरू केली. या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी लघुपट, माहितीपट, जाहिराती यांनाही आवाज देत या क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण केली. अनेक महत्त्वाच्या राजकीय- सामाजिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भिडे यांनी केले होते. शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा १९९५ मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी अशा अनेक कार्यक्रमांमागचा आवाज हा प्रदीप भिडे यांचा होता.
वृत्तनिवेदकाच्या भूमिकेतून..
सह्याद्री वाहिनीवर वृत्तनिवेदक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या भिडे यांनी काही महत्त्वाच्या घटना बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळचे विशेष बातमीपत्र त्यांनी वाचले होते. त्या दिवशी मुंबईत सगळीकडे अघोषित संचारबंदीचे वातावरण होते. त्या वेळी पोलिसांच्या गाडीतून वरळीतील दूरदर्शन केंद्रावर पोहोचून त्यांनी बातमीपत्रे वाचली. मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या वेळीही त्यांनी बातमीपत्रे वाचली होती. काही घटनांना कारुण्याची झालर असते, बातम्या वाचताना कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता, अभिनिवेश न बाळगता योग्य ते भाव आवाजातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची किमया त्यांनी साधली. त्यांच्या आवाजावर लोकांनी भरभरून प्रेम केले. बातमी कशी वाचली आहे, ते वाचून काय वाटले याचा प्रतिसादही लोकांकडून लगोलग मिळायचा, असे ते सांगत असत. वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालकाकडे केवळ आवाज असून चालत नाही, त्यासाठी बुद्धिमत्ताही हवी, हजरजबाबीपणाही तुमच्या ठायी असायला हवा, असे ते ठामपणे सांगत असत.
विविधांगी ओळख
प्रदीप भिडे यांनी नाटकातही काम केले होते. रत्नाकर मतकरी यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक प्रायोगिक नाटके, रवी पटवर्धन, दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबर त्यांनी रंगभूमीवर काम केले होते. आवाज ही त्यांची ताकद त्यांनी जपली, वाढवली. त्याही पलीकडे जात ‘ई मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’सारख्या प्रतिष्ठित, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.