मालिका निर्मात्यांची दुहेरी कसरत

कठोर र्निबधातही मनोरंजनात खंड पडू नये यासाठी मालिकांचे चित्रीकरण परराज्यात होत असले तरी मुंबईसह राज्यात असलेली चित्रीकरण स्थळे मात्र अद्यापही निर्मात्यांच्याच ताब्यात आहेत

निलेश अडसूळ

परराज्यात चित्रीकरण सुरू असताना मुंबईतही पाय घट्ट; निर्मिती खर्च दुप्पट

मुंबई : कठोर र्निबधातही मनोरंजनात खंड पडू नये यासाठी मालिकांचे चित्रीकरण परराज्यात होत असले तरी मुंबईसह राज्यात असलेली चित्रीकरण स्थळे मात्र अद्यापही निर्मात्यांच्याच ताब्यात आहेत. तात्पुरते चित्रीकरण परगावी गेले असले तरी आज ना उद्या आपल्याला परतावेच लागणार

आहे, या भावनेतून निर्मात्यांनी चित्रीकरण बंद असतानाही इथल्या सेटची देखभाल सुरू ठेवली आहे. किंबहुना ती वास्तू अधिक कसोशीने जपली जात आहे. परिणामी निर्मिती खर्चही वाढल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

करोनाकाळात कठोर र्निबधांमध्ये राज्यात चित्रीकरणाला परवानगी नाकारल्याने निर्माते आणि वाहिन्यांनी राज्याबाहेर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्या मूळ स्थळांवर मालिका आकारास येते ती स्थळे ही मालिकेची प्रतिमा झालेली असते.

आज कठीण काळावर उपाय म्हणून मालिकांनी बाहेरची वाट धरली असली तरी उद्या परिस्थिती निवळल्यानंतर त्या आपल्या मूळ जागेवरच चित्रीकरणासाठी येणार आहेत. त्यामुळे ती जागा, ती वास्तू सुरक्षित ठेवणे, तिची देखभाल करणे ही प्राथमिक गरज असल्याने निर्माते त्याकडे विशेष लक्ष देत आहेत. या जागा ताब्यात राहाव्यात यासाठी चित्रीकरण होत नसले तरी ठरलेले भाडे निर्मात्यांना भरावे लागत आहे.

‘परराज्यात चित्रीकरण सुरू असले तरी इथल्या चित्रीकरणस्थळी दुर्लक्ष करून चालणार नाही. पुन्हा इथेच यायचे असल्याने त्या जागेचे भाडे, तिथली देखभाल याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. उद्या शासनाने परवानगी दिली तर येऊन तयारी करण्यापेक्षा आधीच सगळे आटोपशीर असलेले बरे,’ असे झी मराठी वाहिनीवरील

‘माझा होशील ना’ या मालिकेचे निर्माते सुबोध खानोलकर यांनी सांगितले. हे करताना वाहिन्यांचा आर्थिक पाठिंबा असला तरी निर्मिती खर्चात मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पावसाचे नियोजन

निर्मिती खर्च दुपटीने वाढलेला असताना पावसाळा तोंडावर आल्याने निर्मात्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. मुंबईतील सेट भिजून खराब होऊ नयेत यासाठी सेटवर प्लास्टिकचे छप्पर घालणे, चिखल होऊ नये यासाठी तटबंदी उभारणे, गळती होऊ नये यासाठी पूर्वतयारी, वीज यंत्रणेची डागडुजी अशी बरीच कामे निर्मात्यांना करावी लागणार आहेत. काही सेटवर या कामांना सुरुवात झाली आहे.

चक्रीवादळाचा फटका

सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या सेटला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. ऐतिहासिक वास्तूप्रमाणे उभारलेल्या या सेटची उंची अधिक असल्याने वाऱ्याने पत्रे उडाले. छपरावर आच्छादलेले प्लास्टिक फाटले. बऱ्याच ठिकाणी गळती झाली आहे.

तर उडालेले पत्रे ज्या ठिकाणी पडले तिथेही मोडतोड झाली आहे. तसेच सेटवरील इतर वस्तूंचेही नुकसान झाले आहे.

पूर्वी सकाळ आणि रात्र अशा दोन सत्रांत दोन सुरक्षारक्षक लागत. आता चित्रीकरण थांबल्याने घुसखोरीची भीती आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक वाढवावे लागले. शिवाय सेटची आणि तेथील वस्तूंची नियमित डागडुजी करावी लागते. शिवाय मुंबईच्या तुलनेने परराज्यात चित्रीकरण करणे अधिक खर्चीक आहे. त्यामुळे सध्या निर्मात्यांना दुप्पट रक्कम मोजावी लागत आहेत. वाहिन्यांनी आर्थिक पाठिंबा दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

– डॉ. घनशाम राव, निर्माते (स्वराज्यजननी जिजामाता)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Double workout of the series creators ssh

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या