१० दिवसांत करोना रुग्णांची संख्या वाढल्याचा परिणाम

मुंबई : गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये पुन्हा मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्या व प्रतिबंधित मजल्यांची संख्याही वाढू लागली आहे. १८ ऑगस्टला मुंबईत २४ इमारती प्रतिबंधित होत्या, तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ही संख्या ४८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या इमारतींमधील १२०० हून अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

करोनाचे प्रतिबंधात्मक र्निबध शिथिल केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे खरेदीसाठीही गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्याही वाढत आहे. ऑगस्टमध्ये २०० पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णांची संख्या आता ४०० च्या पुढे गेली आहे. रुग्णवाढ होत असल्यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच सर्व पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत करोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोर पालन करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाचपेक्षा जास्त रुग्ण इमारतीत सापडल्यास ती इमारत १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्याचा नियम असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. लोकांची गैरसोय झाली तरी करोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता या नियमाचे पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. तसेच पाचपेक्षा कमी रुग्ण असल्यास केवळ रुग्ण राहत असलेला मजला प्रतिबंधित करण्याचा नियम आहे. त्यानुसार सर्व विभाग कार्यालयांमध्ये सध्या अंमलबजावणी सुरू असून गेल्या बारा दिवसांत प्रतिबंधित इमारतींची संख्या दुप्पट झाली आहे.

मुंबईत गेल्या दहा-बारा दिवसांत लालबाग, परळ, भायखळा, दादर-माहीम, कुलाबा, वांद्रे-खार पश्चिम, वडाळा, नायगाव या भागांत वेगाने रुग्णवाढ होत असल्याचेही आढळून आले आहे.

सर्वाधिक प्रतिबंधित इमारती वांद्रे पश्चिममध्ये

१८ ऑगस्टला मुंबईत के वळ २४ इमारती प्रतिबंधित होत्या, तर २ सप्टेंबरला प्रतिबंधित इमारतींची संख्या ४८ वर पोहोचली आहे. सुदैवाने मुंबईत प्रतिबंधित चाळी व झोपडपट्टय़ांची संख्या शून्य आहे. प्रतिबंधित इमारतींमध्ये सर्वाधिक इमारती वांद्रे पश्चिम भागात आहेत. त्याखालोखाल अंधेरी, जोगेश्वरीचा पश्चिम भाग असलेल्या के  पश्चिम, चेंबूर, मलबार हिल-ग्रँट रोड या भागांत प्रतिबंधित इमारती आहेत.

प्रतिबंधित इमारती

  • वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम (एच पश्चिम)- ११
  • अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले (के पश्चिम)-    ९
  • चेंबूर (एम पश्चिम)-  ६
  • मलबार हिल, ग्रॅण्ट रोड (डी)-  ६

प्रतिबंधित मजले

  •  कांदिवली (आर दक्षिण)-७३
  • अंधेरी, विलेपार्ले पश्चिम

(के पश्चिम)- ११६

  • दादर, माहीम, धारावी

(जी उत्तर)-  १०२

  • मालाड (पी उत्तर)- ९९
  • बोरिवली (आर मध्य)- ९७
  • मुलंड (टी)-  ९३

अनेक ठिकाणी मजले प्रतिबंधित

मुंबईत सध्या १२८५ ठिकाणी इमारतींचे मजले प्रतिबंधित असून केवळ भांडुप व वांद्रे, खार पूर्वचा भाग वगळता सगळ्या मुंबईत अनेक ठिकाणी मजले प्रतिबंधित आहेत. यात सर्वाधिक मजले कांदिवली, अंधेरी पश्चिम, दादर-माहीम, मालाड या भागांत प्रतिबंधित आहेत.