: डॉ. पायल तडवी यांची छळवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या आईने केलेल्या तक्रारीची दखल न घेता जबाबदारी झटकणाऱ्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाच्या तत्कालिन युनिट प्रमुख डॉ. चिंग लिंग यांना आरोपी का केले नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.  त्यावर डॉ. चिंग लिंग यांच्यावर रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याबाबत पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.

डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांचे जबाब वाचल्यानंतर डॉ. चिंग लिंग यांनाही या प्रकरणी आरोपी करायला हवे होते, असे मत व्यक्त केले.