ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्याजवळील घटना

पूर्वद्रुतगती महामार्गावर खडबडीत रस्त्यावरील भेगेपायी मुलुंडमधील नामवंत डॉक्टर प्रकाश वझे यांचा शुक्रवारी दुपारी अपघाती मृत्यू ओढवला. ते ६७ वर्षांचे होते. या खडबडीत रस्त्यावर डॉ. वझे यांची दुचाकी अडखळून पडली आणि मागूना येणाऱ्या  मालवाहू टेम्पोने त्यांना चिरडले. या अपघातात डॉ. वझे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वैद्यकीय मदतनीस हनुमंतप्पा हेगडे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाती मृत्यूमुळे राज्यातील रस्त्यांची दुर्दशा पुन्हा एकवार चर्चेत आली आहे.

आनंदनगर जकात नाका आणि टोल नाकादरम्यान क्षेपणभूमीकडे जाणारा रस्ता आहे. या वळणावर रस्ता उंचसखल बनला आहे. तेथेच डॉ. वझे यांची स्कूटर अडखळली आणि ते आणि त्यांचा सहकारी खाली पडले. त्याच वेळी मागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली. डॉ. वझे यांच्या शरीरावरून तर हेगडे यांच्या हातावरून टेम्पो गेला. गंभीर जखमी झालेल्या डॉ. वझे यांना उपचारार्थ मुलुंडच्या सावरकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल टेम्पोचालक निळकंठ चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे  यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

गेली चार दशके मुलुंडमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. वझे यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. क्रिकेट पंच होण्यासाठीच्या परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित अनेक सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून भूमिका बजावली होती. मात्र गेल्या दहा वर्षांपासून बुद्धिबळाच्या प्रचारासाठी त्यांनी वाहून घेतले होते. त्यांनी डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना केली होती. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते दरवर्षी बुद्धिबळाच्या सहा मोठय़ा स्पर्धा आयोजित करीत. ते मुलुंड पूर्वेकडील स्वप्नील इमारतीत पत्नी प्राजक्ता यांच्यासह राहात होते. त्यांच्या अपघाती निधनाने क्रीडाविश्व आणि मुलुंडच्या रहिवाशांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. वझे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धामध्ये देशभरातून खेळाडू सहभागी होत. यापैकी बहुतांश स्पर्धाना मुंबई बुद्धिबळ संघटनेची मान्यता असे. याशिवाय वझे प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. मुलुंडमधील डॉक्टरांसाठी ते विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करीत. क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रासोबत समाजकार्यातही ते पुढे असत. त्यामुळे डॉ. वझे मुलुंडमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री मुलुंड पूर्वेकडील टाटा वसाहतीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार आणि रविवारी डॉ. वझे यांनी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या कंपनीचे जाहिरात फलक (फ्लेक्स) आणण्यासाठी ते ठाण्याला गेले होते. फ्लेक्स आणण्यासाठी दुचाकीऐवजी गाडी नेण्यास त्यांच्या पत्नीने सुचवले, मात्र दुचाकीवरून लवकर येऊ, असे सांगून ते गेले. अपघातानंतर त्याच फ्लेक्समध्येच गुंडाळून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.