डॉ. संजय ओक यांचे ग्रामीण भागात दर रविवारी मोफत दहा शस्त्रक्रियांचे व्रत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच वर्षांच्या राजूच्या गळ्यात गाठ झाली होती. उपचारासाठी मुंबईला यायचे म्हटले तरी त्याच्या घरच्याकडे पैसे नव्हते. शहापूरच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन विख्यात बाल शल्यविशारद डॉ. संजय ओक यांनी गळ्यातील गाठीवर शस्त्रक्रिया केली. एवढेच नव्हे तर दादरच्या डॉ. फडके लॅबमध्ये या गाठीची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आली. गाठ कॅन्सरची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता राजूवर पुढील उपचार डॉ. ओक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. ओक हे नित्यनियमाने दर रविवारी ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात जाऊन महिन्याला किमान पन्नासहून अधिक गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत असतात.

अलीबागच्या जिल्हा रुग्णालयात अडीच वर्षांच्या अनुजावर दुर्बीण शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपिक) करण्याची गरज दिसून आल्यानंतर डॉ. संजय ओक यांनी तिला मुंबईतील प्रिन्स अलीखान रुग्णालयात दाखल करून डॉ. राकेश शहा यांच्या मदतीने मोफत दुर्बीण शस्त्रक्रिया केली. आता अनुजाची प्रकृती उत्तम

आहे. रुग्णसेवेचे असिधर व्रत गेली अनेक वर्षे डॉ. संजय ओक चालवत आहेत. पालिकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर सध्या माझगावमधील प्रिन्स अलीखान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षांत एकाही रविवारी सुट्टी न घेता शहापूर व अलीबाग जिल्हा रुग्णालय तसेच डेरवण आणि आता कुडाळ जिल्ह्य़ात रुग्णालयात जाऊन दहा बालकांच्या शस्त्रक्रिया करण्याचे व्रत त्यांनी चालवले आहे.

मुंबईहून अलिबागला बोटीने जाऊन तेथील जिल्हा रुग्णालयात एका रविवारी किमान दहा बालकांवर शस्त्रक्रिया करतात. दुसऱ्या रविवारी शहापूर जिल्हा रुग्णालयात तर तिसऱ्या रविवारी डेरवणमध्ये जाऊन किमान पंधरा शस्त्रक्रिया डॉ. ओक करत असतात. आरोग्य विभागाच्या ठाणे येथील उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे म्हणाल्या की, ‘राष्ट्रीय बालसुरक्षा योजने’अंतर्गत बहुतेक सर्व शस्त्रक्रिया डॉ. ओक यांच्यामुळे आम्ही करू शकलो.

याबाबत विचारले असता डॉ. ओक म्हणाले की, अनेक गरीब रुग्ण हे मुंबईपर्यंतही येऊ शकत नाहीत. अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करू देण्याबाबत विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केल्यामुळे जानेवारीपासून मी दर रविवारी या शस्त्रक्रिया करत असतो. याशिवाय गेली पाच वर्षे डेरवणच्या रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करत असून महिन्याकाठी किमान पन्नास बालकांवर शस्त्रक्रिया करतो. डेरवणच्या रुग्णालयात आठ सुसज्ज शस्त्रक्रिया गृहे आहेत. समाजातील मोठय़ा डॉक्टरांनी जर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन महिन्यातील दोन रविवारी शस्त्रक्रिया केल्या तर हजारो गरीब रुग्णांना मोठी मदत होऊ शकेल. शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत. मोठय़ा खासगी रुग्णालयातीलच नव्हे तर केईएमसारख्या पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनीही एखाद्या रविवारी शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांवर उपचार केल्यास गरीब रुग्णांना मोठा आधार मिळेल, असेही ओक म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sanjay oak to do free ten surgery on every sunday in the rural areas
First published on: 22-10-2017 at 04:59 IST