मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग हे निरोप समारंभात आम्हाला मार्गदर्शन करतील वा आतापर्यंत सांभाळलेल्या विविध जबाबदारीतून काही अनुभवाचे बोल ऐकायला मिळतील, असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी निरोपाच्या भाषणातून आम्हाला ‘पॉलिटिकल अजेंडा’च ऐकवला, अशी प्रतिक्रिया या समारंभाला उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये उमटली. माजी आयुक्तांची गेल्या अनेक वर्षांतील एकूण कार्यपद्धत पाहता ते असे भान पाळतील, अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली, असाही सूर उमटला..
आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगणाऱ्या डॉ. सिंग यांच्या राजीनामा नाटय़ाने अनेक अधिकारी चक्रावले होते. राजीनामा मंजूर झालेला नसतानाही आपला राजकीय मनोदय वृत्तवाहिन्यांसमोर मांडणारे डॉ. सिंग पोलिसांच्या बैठकीत मात्र काहीही बोलणार नाहीत, असे वाटले होते. मात्र त्यांनी हा संकेत पाळला नाही.
डॉ. सिंग यांची राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाल्यानंतर दुपारच्या सुमारास अचानक सर्व वरिष्ठ निरीक्षकांना नायगाव येथील सभागृहात जमा होण्यास सांगण्यात आले. यावेळी कुठलेही कारण देण्यात आले नव्हते. ३१ जानेवारी असल्यामुळे निवृत्त होणाऱ्या पोलिसांसाठी सन्मान परेड होती. त्याचवेळी डॉ. सिंग यांनाही मानवंदना देण्यात आली. त्यावेळी त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता. सभागृहात डॉ. सिंग यांच्या आगमनानंतर त्यांचाही निरोपसमारंभ असल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आले.
राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले तरी सेवेतील शेवटच्या क्षणी त्यांनी सेवाविषयक अटी व शर्तीचा भंग केल्याची कुजबूज ऐकायला मिळत होती.