२१ लाखांचा माल जप्त

कॅलविन क्लेन, मोवादो स्वीस, फास्टट्रॅक आदी नामांकित कंपनीची बनावट घडय़ाळे बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ४ हजार १८० बनावट घडय़ाळांसह घडय़ाळांचे सुटे भाग, घडय़ाळे बनविण्याचे साहित्य असे सुमारे २० लाख ९७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपी अफजल अहमद मोहम्मद अरिफ अली अन्सारी (४०) या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

मस्जिद बंदर येथील काझी सय्यद स्ट्रीटवरील अन्सारी याचा घडय़ाळे बनविण्याचा कारखाना होता. मागील सुमारे दीड वर्षांपासून तो हा कारखाना चालवत होता. त्यामध्ये नामांकित कंपनीची बनावट घडय़ाळे तयार केली जात. यासाठी नामांकित कंपनीच्या घडय़ाळांप्रमाणे दिसणारे साहित्य खरेदी केले जाई. त्याआधारे घडय़ाळे तयार करून त्यांची विक्री दुकानदारांना केली जाई. त्यामुळे कंपन्यांची व ग्राहकांची अशी दोघांची फसवणूक होत होती. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने स्वॉच ग्रुप या कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत अन्सारी याच्या कारखान्यावर छापा घातला. छाप्यात पोलिसांनी सुमारे २० लाख ९७ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी अन्सारीवर पायधुनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि कॉपीराइटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने केली.