मुंबई : ठाकरे गटामुळेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवले. या निर्णयामुळे आमच्यावरच अन्याय झाला असून, इतरांनी गळा काढू नये. बहुमत असूनही आमचा दावा नाकारला गेल्याने आम्ही आयोगापुढे दाद मागू, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

 ‘‘आम्ही आयोगापुढे वेळोवेळी कागदपत्रे आणि शपथपत्रे दाखल केली. मात्र, उद्धव ठाकरे गटाने आयोगाकडे फक्त तारखा मागितल्या, कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे वेळेत निर्णय होऊ शकला नाही आणि चिन्ह गोठविले गेले. ठाकरे गटामुळे चिन्ह गोठविले गेले, असे केसरकर म्हणाले.

सध्या केवळ सर्वसामान्य शिवसैनिकाला भडकवण्याचे काम सुरू आहे. जुन्या गोष्टी जोडून-तोडून दाखविल्या जात आहेत. आता समाजमाध्यमांवरून भावनिक आवाहन केले जात आहे. पण, शिवसैनिकांनी त्याला भुलू नये, असे केसरकर म्हणाले. अंधेरीतून कोण निवडणूक लढणार, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असे केसरकर यांनी सांगितले.